अमृत महोत्सवाची सांगता : उपस्थितांचे डोळे पाणावले

उस्मानाबाद (प्रतिनिधी) :-

ारकरी कुटुंबात जन्म घेतल्यामुळे माझ्यावर अगदी बालपणी आध्यात्मिक संस्कार झाले आहेत. त्यानंतर आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेत शिकलो. तिथे खूप मोठमोठ्या महाराजांची सेवा करता आली. शिकता आले. शेताच्या बांधावर येऊन लोक कीर्तनाचे निमंत्रण देत असायचे. पुढे वारकरी संप्रदायात रमलो. महाराष्ट्राच्या कानाकोपाऱ्यात कीर्तने केली. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम करता आले. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी परमार्थ अनुभूती महत्त्वाची आहे. हे अनुभवाने शिकता आले, असे प्रतिपादन हभप.संदिपान महाराज शिंदे-पाटील हासेगांवकर यांनी केले.  

तालुक्यातील श्री.क्षेत्र तेर येथील संतधाम परिसरात अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आयोजित अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात झालेल्या पंचतुला व संतपूजनास उत्तर देताना ते बोलत होते.

यावेळी संतपीठावर गुरुवर्य शांतीब्रम्ह मारुती महाराज (बाबा) कुरेकर, हभप.पांडूरंग घुले, हभप.शाम महाराज, हभप.उल्हास महाराज,  हभप.अविनाश गरड, हभप.संदिपान येवले महाराज, हभप.गणेश सोनवणे महाराज, बापू थोडसरे, हभप.गणेश बडगे महाराज,  हभप.अशोक महाराज आपेगांवकर, हभप.नाना महाराज कदम, हभप.नारायण उत्तरेश्वर, हभप.रघुनंदन महाराज, नायगावकर बाबा, बप्पा शेळके, नामदेव उगिले, रामकृष्ण शिंदे-पाटील, किरण सुर्यवंशी, दिनेश जाधव, विवेकानंद शिंदे-पाटील, शरद जाधव उपस्थित होते.

हभप.संदिपान महाराज शिंदे-पाटील हासेगांवकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त चार दिवसीय आध्यात्मिक अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये सुप्रसिद्ध हभप.चैतन्य महाराज देगलूरकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर उत्सवमूर्ती हभप.संदिपान महाराज यांची गुळ, तांदूळ, साखर, तेल आणि वस्त्र अशा पाच वस्तुंनी पंचतुला व सपत्नीक यथोचित संतपूजन करण्यात आले. पुढे हभप.पांडूरंग घुले यांनी हभप.संदिपान महाराजाच्या बालपण व तारुण्यातल्या आठवणी सांगून शुभेच्छा दिल्या. शेवटी, हभप.गुरुवर्य शांतीब्रम्ह मारुती महाराज (बाबा) कुरेकर यांनी आर्शीवचन दिले.

पुढे बोलताना हभप.संदिपान महाराज म्हणाले की, आयुष्यभर आध्यात्मिक सेवा करता आली. हे माझं भाग्य आहे. पण, इथंपर्यतचा प्रवास सोपा नव्हता. रात्री-अपरात्री प्रवास आणि कीर्तने केली. त्यामुळे यात माझ्या कुटुंबांसह वारकरी परंपरेतील शेकडोंचा वाटा आहे. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी केवळ निमित्तमात्र होतो. कारण, झाडाची मुळ दिसत नसतात.पण, झाडाची वाढ फक्त मुळांवरच अवलंबून असते. त्यामुळे वारकरी संप्रदायातले सगळे माझी मुळं आहेत. त्यावर मी उभा आहे.

कार्यक्रमाचे औचित्य साधून शेकडो लोकांनी हभप.संदिपान महाराज व त्यांच्या सुविद्य पत्नी कुसुमताई यांचे पुष्पहार व वेगवेगळ्या मूर्ती, फोटो, वस्त्र, शाल, श्रीफळसह आध्यात्मिक भेट वस्तू देऊन आशीर्वाद घेतले. याप्रसंगी डॉ.नायगावकर परिवाराच्या वतीने साखर व तांदूळाने सपत्नीक तुला करण्यात आली. तसेच जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने जोग महाराजांच्या चांदी पादुका हभप.संदिपान महाराजांकडे सुपूर्द केल्या.

यावेळी वारकरी संप्रदायातले अनेक नांमकित कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार, गडकरी, फडकरी, गायक, वाद्यवृंद, वारकरी, टाळकरी आणि भाविक-भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली....तर विलासराव होते म्हणून वाचलो - हभप.संदिपान महाराज

२०११ साली अचानक प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी केवळ चार तास सांगितले होते. सर्व घाबरले होते. मात्र, विलासराव देशमुख यांनी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. त्यामुळे केवळ ४१ मिनिटात रुबी हॉल पुणे येथे दाखल झालो. तर विलासराव देशमुख होते म्हणून वाचलो. हे सांगताना हभप.संदिपान महाराजांचे डोळे पाणावले होते.


  ...हल्ली आध्यात्मावर बोलल्याशिवाय काहींचा दिवस जात नाही - हभप.चैतन्य महाराज

नाम वाटते तितके सोपे नाही. राम म्हण्याला पुण्य लागतं. मरा म्हण्याला पुण्य लागत नाही. संप्रदायाला विचाराचे दारिद्रय कधीचं नव्हते आणि नसेल. ज्ञानोबा-तुकोबा हजारो पिढ्या पुरुन उरतील. मात्र, हल्ली संत आणि आध्यात्मावर बोलल्याशिवाय काहींचा दिवस जात नाही. त्यामुळे वैचारिक गोंधळ सुरु आहे, असे स्पष्ट मत हभप.चैतन्य महाराज देगलूरकर यांनी आपल्या काल्याच्या कीर्तनात मांडले.


 ...अन उपस्थितांचे डोळे पाणावले

मंदिराचा कळस सगळे पुजतात. मात्र, पाया सुध्दा तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे हभप.संदिपान महाराज यांना पदोपदी साथ देऊन कौटुंबिक जबाबदारी हिमतीने सांभाळणाऱ्या कुसुमताई शिंदे-पाटील म्हणजे गुरुवर्य बाबा नावाच्या मंदिराचा पाया आहे, असे हभप.अनिल महाराज पाटील यांनी म्हटले. तेव्हा संतपीठावर बसलेल्या कुसुमताईंचा हुंदका दाटून आला. हे पाहून उपस्थितांचे सुध्दा डोळे पाणावले होते.

 
Top