उस्मानाबाद / प्रतिनिधी-

   समाजात  निर्लेप वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थाचे कार्य समाजासमोर आले पाहिजे तसेच त्यांच्या लोकसेवेचा आदर्श सर्वांसमोर येऊन पुढच्या पिढयांसाठी आदर्श निर्माण झाला पाहिजे',असे प्रतिपादन मिलिंद पाटील यांनी केले.

भारतरत्न माजी पंतप्रधान कै.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त  लोकसेवा समिती धाराशिव यांच्या वतीने  देण्यात येणाऱ्या लोकसेवा पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी  लोकसेवा समितीचे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. मिलिंद शंकरराव पाटील यांचे शुभहस्ते आणि श्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले,या प्रसंगी ते बोलत होते.

 हे या पुरस्काराचे 13 वे वर्ष आहे. यावेळी व्यासपीठावर  संस्थेचे सचिव श्री कमलाकर पाटील आणि सौ. सुषमा पाटील हे उपस्थित होते.

मराठवाडा पातळीवरील  हा पुरस्कार यावेळी परभणी येथील श्रीमती श्रीलेखा श्रीनिवास वझे, आनंदवाडी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील ज्ञानोबा पंढरीनाथ चामे आणि वाशी,जिल्हा धाराशिव येथील श्री. विश्वास शिवाजी उंदरे  यांना रु 11000/- रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला.  श्री ज्ञानोबा चामे यांनी आनंदवाडी तालुका निलंगा जिल्हा लातूर या गावांमध्ये श्रमदानातून रस्ते, वीज, पाणीटंचाई, अस्वच्छता या संकटावर मात करून एक आदर्श घालून दिला आहे. त्याचबरोबर बिनविरोध ग्रामपंचायत निवडीच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश त्यांनी दिला आहे. याचबरोबर तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथील विश्वास शिवाजी उंदरे यांनी नैसर्गिक शेतीमधील त्यांचे योगदान व गटशेतीच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीला त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले व शेतकऱ्यांचा आर्थिक विकास केला आहे. याचबरोबर परभणी येथील श्रीमती श्रीलेखा श्रीनिवास वझे यांनी किशोरवयीन मुलींमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे, त्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करणे, तसेच  संस्कार वर्ग, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना लोकसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक करताना श्री कमलाकरत पाटील यांनी या पुरस्काराच्या साठीची ऊर्जा म्हणजे अटलजी आहेत आणि हा पुरस्कार नि:स्पृह सेवा करणार्यांना अधिक ताकदीने काम करण्याची ऊर्जा मिळावी यासाठी दिला जातो. समाजात असे अनेक सेववृती आहेत त्यांच्यापर्यंत संस्थेला नेण्यासाठी सर्वांचा सहभाग मिळावा असे आवाहन उस्थितांना केले.

या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी संस्था सदस्य श्री शेषाद्री  डांगे, कोषाध्यक्ष श्री श्रीराम पाटील, रोटरी सेवा ट्रस्ट चे श्री रवींद्र साळुंके दादा तसेच शहरातील मोठ्या संख्येने  नागरिक, शिक्षक, प्राध्यापक निमंत्रित, पत्रकार उपस्थित होते.  

यावेळी वैयक्तिक गीत सादरीकरण  प्रा. शशिकांत देशमुख यांनी   केले. संचालन श्री संदीपान गायकवाड तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक डॉ मनीष देशपांडे  यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शांतिमंत्राने झाली.

 
Top