उस्मानाबाद / प्रतिनिधी -

 जिल्ह्यात नवीन उद्योग व्यवसाय सुरू करून येथील युवकांनी स्वालंबी व्हावे यासाठी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत राबविलेल्या नोंदणी मोहिमेत शेळी पालन करण्याची इच्छा असलेल्या नवउद्योजकांनी बीजभांडवल किंवा मुद्रा (कृषी) योजनेच्या माध्यमातून बँकेत प्रस्ताव दाखल करावेत असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले असून पहिल्या टप्प्यात २०२३ अखेर प्रथम उद्दिष्ट १०,००० शेळ्यांचे ठेवले आहे. उस्मानाबादी शेळी तिच्या खास वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध असून बाजारात या शेळीला चांगली मागणी आहे, शेतीला पूरक जोडधंदा म्हणून हा व्यवसाय अतिशय उपयुक्त आहे.

दि.१५/०७/२०२२ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हाभर ‘आत्मनिर्भर भारत; आत्मनिर्भर धाराशिव’ अभियानंतर्गत उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छुकांचे नांव नोंदणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते. यामध्ये एकूण १०,५०० नावांची नोंदणी करण्यात आली. त्यातील ३,११७ परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्र (DIC) कडे दाखल करण्यात आले असून यापैकी २,८५२ प्रस्ताव बँकेकडे पाठविण्यात आले आहेत. या माध्यमातून अनेक जन बँकेकडून कर्ज प्राप्त करून स्वतःचा नवा व्यवसाय सुरू करीत आहेत अथवा चालू व्यवसायाला वृद्धिंगत करत आहेत.

तेरणा जनसेवा केंद्राच्या माध्यमातून वेळोवेळी आयोजित केलेल्या अनेक मार्गदर्शन शिबिरांच्या परिणाम स्वरूप जिल्ह्यातील अनेकांनी प्रस्ताव दाखल केले असुन प्रकल्प मंजुरीसह उद्योग सुरु देखील केले आहे. तेरणा जनसेवा केंद्राच्या माध्यमातून कर्जाची फाईल तयार करण्यापासून ते कर्ज मंजूर करून देईपर्यंत सर्वकाही मदत केली जाते.

धाराशिव (उस्मानाबाद), कळंब, तुळजापूर या तीन तालुक्यातून आलेल्या प्रस्तावातील ४९० प्रस्ताव शेळी पालनाचे आहेत. जिल्हा उद्योग केंद्राच्या बीजभांडवल योजनेतून व  मुद्रा (कृषी) योजनेतून प्रामुख्याने या प्रस्तावांना मंजुरी घेण्यात येणार आहे. तसेच गरजे नुसार व्याजमाफी, अनुदान स्वरूपात मदत मिळण्यासाठी वसंतराव नाईक महामंडळ, आण्णाभाऊ साठे महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व इतर महामंडळाच्या सहाय्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.

सर्व सामान्य कुटुंबासाठी शेळी पालन व्यवसाय अतिशय फायदेशीर असुन जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या व्यवसायासाठी प्रस्ताव दाखल करावे असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. नाव नोंदणी व प्रस्ताव दाखल करण्याकरिता श्री.किरण आवटे - ९८५०५०९९२० यांना प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे संपर्क साधावा.

 
Top