उस्मानाबाद / प्रतिनिधी 

 उस्मानाबाद जिल्हयात सर्वत्र वेळअमावस्या सण उत्साहात साजरा  करण्यात आला.  शेतातील उत्पन्नाची समृद्धी व भरभराटी होण्याची मनोकामना व्यक्त करत शुक्रवारी (ता.२३) काळ्याआईची मनोभावे विधीवत पुजा करून  असंख्य शेतकरी कुटुंबांनी वेळा अमावस्या उत्साहात साजरी केली. दरम्यान यंदा रब्बीच्या पेरण्याला थोडा उशीरा झालेला असला तरी पाण्याच्या उपलब्धेतेमुळे पिकांचा बहार आणखी वाढला आहे. दुपारी साडेबारानंतर शेतकऱ्यांनी नातेवाईक मित्रपरिवारासह वन भोजनाचा आनंद घेतला. 

 शेतकरी  कुटुंबासाठी वेळा अमावस्याचा  सण म्हणजे आनंद, उत्साहाची पर्वणीच असते. यंदा परतीच्या पावसा दरम्यान अतिवृष्टीने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडवली होती. परिणामी रब्बीची पेरणी उशीरा सुरू झाली. सध्या कांही शिवारात ओलीताखालील पिके बहरात आलेे असले तरी पिकांवरील किड, अळीचे विघ्न दुर करण्याचा खटापोट शेतकऱ्यांना करावा लागतोय. वेळा अमावस्या  असल्याने शहरात अघोषित संचारबंदी असते. शेत- शिवारात मौजमजा करण्याला जणू संधीच मिळाली. 

 अमावस्याच्या पुजेसाठी व विविध खाद्यपदार्थाच्या तयारीसाठी शेतकरी कुटुंबात गुरुवारपासुनच (ता.२२) तयारी सुरू होती. शुक्रवारी सकाळपासुन ज्वारीचे पीठ, दह्यापासुन तयार केलेल्या अंबिलाचे मडके घेऊन शेतकरी शेत शिवारात जात असल्याने चित्र दिसत होते. आता दळणवळणाची साधने वाढल्याने बऱ्याच शेतकरी कुटुंबातील व्यक्ती मडक्याचा प्रवास वहानातुन सुरू असल्याचे  चित्र दिसून आले.

 बैलांना सजवुन बैलगाडीतुन सहकुटुंब शेताकडे जाण्याची मजा औरच असते. अजुनही बरेच शेतकरी कुटुंब बैलगाडीतुन वेळ अमावस्येला जाण्याची प्रथा कायम ठेवली आहे. दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टरमधुनही शेताकडे शेतकरी कुटुंब जात असल्याचे चित्र दिसून आले. दुपारी बारानंतर शेतकरी कुटुंबांनी पाच पांडवाची विधीवत पुजा केली, त्यानंतर शेतातील ज्वारी, हरभरा पिकावर अंबिल शिंपडण्यात आले. ज्वारी, हरभरा, गहू, करडई पिकाच्या हिरवाईत बच्चे कंपनी मनसोक्त खेळाचा आनंद घेतला. वनभोजनानंतर कडवट- अंबट बोरं, हिरव्या चिंचा आणि मधमाश्यांनी संकलित केलेल्या मकरंदाचा आस्वाद चिमूूकल्यांनी घेतला.

 वन भोजनाचा घेतला स्वाद

 बाजरीपासुन बनविलेले उंडे, बाजरी व ज्वारीच्या कडक भाकरी तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या, वटाणा, हरभऱ्याचे हिरवे दाणे, बेसन यापासुन बनविलेली भाजी (भज्जी), वांगे, कांद्याची पात व हिरव्या मिरच्यापासुन तयार केलेले भरीत, गव्हाची खीर, कोंदीच्या गोड पोळ्या, आंबट भात (खिचडा) या विविध शक्तीवर्धक पदार्थासह अंबिलाचा घोट घेत दुपारी साडेबारानंतर शेत शिवारात वनभोजनाचा शेतकरी कुटुंब व मित्रपरिवारांनी मनसोक्त स्वाद घेतला.


पाटील मळ्यात मनोभावे पूजा

मुरूम शहराजवळील "पाटील मळा" येथील शेतात  देवी-देवतांची मनोभावे पूजा करून वेळा अमावस्या सण केला साजरा केली. शेतकरी बांधवांसमोरील सर्व संकटे दूर व्हावी शेतकऱ्यांना समृध्दी लाभावी, असे साकडे यावेळी घातले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष  बसवराज  पाटील  ,उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष  बापूरावजी काका पाटील   महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील आदींची उपस्थिती होती. 


 
Top