उस्मानाबाद / प्रतिनिधी-  

जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त उस्मानाबाद येथे मानवाधिकार व सामाजिक न्याय शिष्टमंडळाच्या वतीने शनिवारी (दि.10) संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. भारतीय संविधानाने देशातील नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्काबाबत रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या पदाधिकार्‍यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

 जगभरात 10 डिसेंबर हा दिवस जागतिक मानवाधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने उस्मानाबाद शहरात मानवाधिकार व सामाजिक न्याय शिष्टमंडळाच्या वतीने शनिवारी सकाळी जनजागृती रॅली काढण्यात आली. शहरातील राजमाता जिजाऊ माँसाहेब चौक येथून रॅलीस प्रारंभ झाला. तांबरी विभाग, संत गाडगे महाराज चौक, भारतत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक, जिल्हा न्यायालय या मार्गावरुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या रॅलीचा समारोप करण्यात आला.

 संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण व्हावे, प्रत्येकाला सन्मानाने जगता यावे, या हेतूने ही रॅली काढण्यात आली असल्याचे यावेळी संयोजकांनी विचार व्यक्त करताना सांगितले. जो आपल्या हक्कासाठी जागरुक असतो, त्यालाच न्याय मिळतो, म्हणून प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्कासाठी जागरुक राहिले पाहिजे असेही ते म्हणाले.

 या रॅलीमध्ये मानवाधिकार सामाजिक न्याय शिष्टमंडळाचे पदाधिकारी, डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय, श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज, के.टी. पाटील फार्मसी कॉलेज या संस्थांमधील विद्यार्थी, तसेच शहरातील संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

 
Top