उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दि.13 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पोलीस पाटील यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी पोलीस पाटील यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.     प्रारंभी गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते, मीडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, मराठवाडा कार्याध्यक्ष राहुल वाकुरे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील  पाटील, बालाजी खरात, महिला आघाडी कार्याध्यक्ष अश्विनी वाले, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष जोतिराम काटे, भूम तालुकाध्यक्ष रामदास अर्जुन, वाशी तालुकाध्यक्ष बिभीषण थोरबोले,मोहन गुरव, शंकर आहिरे, रुपाली गिरी आदी उपस्थित होते.                 

 जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी जिल्ह्यातील पोलीस पाटील यांच्या अडचणी व प्रश्न जाणून घेण्यासाठी रविवारी बैठक घेतली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, पोलीस पाटील हा गाव पातळीवरील महत्त्वाचा कर्मचारी आहे. गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम केले जाते. प्रत्येक पोलीस पाटील यांनी जागरूक राहून शासकीय जमिनीत अवैध उत्खनन करून गौण खनिजाची व वाळूची कोणी चोरी करून वाहतूक करीत असेल तर थेट तहसीलदार, पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना माहिती द्यावी, तसेच पोलीस पाटील भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पोलीस पाटील नूतनीकरण विनाविलंब तात्काळ करणे, पोलीस पाटील यांना शस्त्र परवाना देणे, पोलीस पाटील यांना ग्रामपंचायत कार्यालयात कक्ष उपलब्ध करून देणे, निलंबित पोलीस पाटील यांना नियमानुसार 90 दिवसांत कामावर रुजू करून घेणे, मानधन दरमहा वेळेवर करणे आदी प्रश्नांवर चर्चा होऊन त्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले. बैठकीला जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top