उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातचे पिक गेले आहे. शासनाने वारंवार घोषणा करूनही शेतकर्‍यांना अनुदान मिळालेले नाही, या संदर्भात शासनाला वेळोवेळी लेखी विनंती करूनही अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे हे अनुदान मिळावे, या व इतर मागण्यांसाठी सरकारच्या निषेधार्थ बुधवारी (दि.23) सकाळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन आले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे सोयाबीन हे मुख्य पीक अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे हातचे गेले आहे. शासनाने वारंवार घोषणा करून अजूनही शेतकर्‍यांना अनुदान मिळालेले नाही. याबाबत सतत पाठपुरावा करून शेतकर्‍याचे अनुदान जमा झालेले नाही. त्यामुळे सतत अडचणीत असलेला शेतकरी अडचणीमध्येच येत आहे. मागील दोन महिन्यात जिल्ह्यातील 14 शेतकर्‍यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या आहेत. या संदर्भात शासनाला वेळोवेळी लेखी विनंती करूनही अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे हे निदर्शने आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला.

या निवेदनात जुलै ते ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत 281 कोटी रुपये जिल्ह्यातील शेतकर्‍यांना त्वरित वाटप करावे, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतील 100 हून अधिक कुटुंबाला गेल्या सात महिन्यापासून शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे ते थांबून त्यांना अपघात विमा त्वरित मंजूर करून वाटप करावा. जिल्ह्यातील रब्बी हंगाम सुरू झाला असून शेतकरी पिकांना पाणी देत असताना विद्युत वितरण कंपनी थकीत वीज बिलापोटी अचानक डीपी बंद करत आहे. ते थांबून शेतकर्‍यांना आठतास पूर्ण क्षमतेने वीज उपलब्ध करून द्यावी. उस्मानाबाद आयुर्वेदिक महाविद्यालयातील पदवीधर प्रवेश क्षमता 25 ने घटविले असून ती पूर्ववत करून जागा त्वरित भरण्यात याव्यात. टेंभुर्णी लातूर रोडचे बहुचर्चित चौपदरीकरण ताबडतोब सुरू करण्यात येऊन कळंब, उस्मानाबाद तालुक्यातील इतर रोडवरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, राष्ट्रवादीचे नेते संजय निंबाळकर, अय्याज शेख, भारत शिंदे, अ‍ॅड.प्रविण शिंदे, प्रशांत फंड, रमेश देशमुख, इकबाल पटेल, बालाजी डोंगे, सागर चिंचकर, मसुद शेख, बिलाल तांबोळी, नितीन चव्हाण, औदुंबर धोंगडे, राजाभाऊ मुंडे, विठ्ठल कोकाटे, मनोज मुदगल, नंदकुमार गवारे, नाना जमदाडे, रणवीर इंगळे, पवार बंधू, वाजिद पठाण, बबन वाकुरे, गादेकर, गणेश गडकर, नाना नलावडे, अशोक बिरांजे, शशिकांत राठोड, शौकत टेलर, शकील वरवंटीकर, अमोल भातभागे, दौलत गाढवे, अण्णा जाधव, ज्योतीताई माळाळे, अप्सरा पठाण, राजकुमार पवार, असद पठाण, सतीश घोडेराव, आश्रुबा गाढवे, अमोल सुरवसे, भाऊसाहेब नन्नवरे, राजपाल दुधभाते आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


 
Top