तुळजापूर  / प्रतिनिधी- 

 अणदूर ग्रामपंचायतसमोर मागील ८५ दिवसापासून चक्री उपोषण करणाऱ्या अरविंद घोडके यांनी शनिवारी आपले उपोषण मागे घेतले. श्री खंडोबा देवस्थान संदर्भात  काही मागण्या मान्य झाल्याने आपण उपोषण मागे घेत असल्याचे त्यांनी गावकऱ्यासमोर सांगितले.

 तुळजापूर तहसील कार्यालयात तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या उपस्थितीत श्रीखंडोबा देवस्थान समिती , श्री खंडोबा संघर्ष समिती, ग्रामस्थ ,मानकरी, पुजारी यांची संयुक्त बैठक शुक्रवारी पार पडली.

 या बैठकीत उपोषणकर्ते अरविंद घोडके यांच्या प्रश्नाला,  श्री खंडोबा देवस्थान समितीचे सचिव सुनील ढेपे आणि डॉक्टर नितीन ढेपे यांनी समर्पक उत्तरे दिली, यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, तसेच देवस्थान समितीवर तहसीलदार आणि स्थानिक आमदार किंवा सरपंच यापैकी एक असे दोन सदस्य घेण्याचा निर्णय घेण्यात आला..

 या बैठकीस गावचे सरपंच रामदादा आलुरे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष मनोज मुळे, सदस्य कल्याणी मुळे, तसेच साहेबराव घुगे, शिवाजी कांबळे, देवस्थान समितीचे उपाध्यक्ष अविनाश मोकाशे, माजी अध्यक्ष प्रकाश मोकाशे, राम मोकाशे, यशवंत मोकाशे आदी उपस्थित होते. या बैठकीत ठरल्याप्रमाणे अरविंद घोडके यांनी शनिवारी सायंकाळी गावकऱ्यांसमोर आपल्या मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. घोडके यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.


 
Top