नळदुर्ग  / प्रतिनिधी-

 नळदुर्ग येथील मराठा गल्ली येथे सुरू असलेल्या श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची दि.२ नोव्हेंबर रोजी पालखी मिरवणुकीने मोठ्याण उत्साहात सांगता झाली. यावेळी पारायण सोहळ्याच्या ४४ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच शहरांतील सर्व हिंदु बांधव मोठ्या संख्येने डोक्यावर भगवी टोपी परीधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यामुळे पुन्हा नळदुर्ग शहरात हिंदु बांधवांची एकजुट दिसुन आली.

        मराठा गल्ली येथे दि.२७ ऑक्टोबर पासुन श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात झाली होती. या पारायण सोहळ्याची सांगता दि.२ नोव्हेंबर रोजी पालखी मिरवणुकीने झाली. प्रारंभी सकाळी ९ वा. ह.भ.प.चैतन्य महाराज वासकर यांचे कीर्तन होऊन पसायदान झाले. त्यानंतर सकाळी ११ वा. ह.भ. प.ढेरे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दुपारी १२.३० वा. आकर्षक फुलांनी सजविलेल्या पालखीतुन माऊलींची भव्य मिरवणुक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत मोगा, गांधोरा व वागदरी येथील दिंड्या सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर नळदुर्ग शहरांतील महिला व पुरुष भजनीमंडळ हेही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीत पहिल्यांदा शहरांतील सर्व हिंदु बांधव डोक्यावर भगवी टोपी परीधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामुळे पुन्हा नळदुर्ग शहरात हिंदु एकतेचे दर्शन झाले. ही मिरवणुक मराठा गल्ली येथुन सुरू झाल्यानंतर पांचपीर चौक, भोई गल्ली, क्रांती चौक, चावडी चौक, बसवेश्वर चौक, भवानी चौक, राम मंदिर, वीर सावरकर चौक, धर्मवीर संभाजी चौक मार्गे मराठा गल्ली येथे आल्यानंतर पालखी मिरवणुकीचे विसर्जन करून श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी पालखी मिरवणुकीत दिंड्यातील बाल वारकऱ्यांनी अतीशय सुंदर व उत्कृष्ट भजनाचा व फुगडीचा खेळ सादर केला. त्याचबरोबर महिलांनीही फुगडीचा खेळ खेळला. मिरवणुक अतीशय शांततेत व शिस्तबध्द पार पडली. यावेळी मिरवणुक मार्गावर ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच मिरवणुकीत सहभागी झालेल्या वारकरी व नागरीकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुक शांततेत पार पडण्यासाठी पारायण समिती, शिवशाही तरुण मंडळ व शहरांतील सर्व हिंदु बांधवांनी परीश्रम घेतले.


 
Top