नळदुर्ग/ प्रतिनिधी-

 निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथे आल्यानंतर मनाला समाधान वाटले असे धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी श्री क्षेत्र रामतीर्थला भेट दिल्यानंतर बोलतांना म्हटले.

         दि.२६ नोव्हेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे महाराष्ट्र राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण समितीचे उमाकांत मिटकर यांच्यासह नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थला भेट दिली. प्रारंभी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उमाकांत मिटकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्याचबरोबर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उमाकांत मिटकर यांच्या हस्ते रामतीर्थ परीसरात वृक्ष लागवड करण्यात आली. पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी श्री क्षेत्र रामतीर्थ येथे वृक्ष लागवड करण्यासाठी ५०० पर्यावरणपुरक वृक्ष मंदिर समितीला भेट दिले आहेत.

  यावेळी झालेल्या कार्यक्रमात श्री क्षेत्र रामतीर्थ देवस्थानच्या वतीने पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व पोलिस तक्रार प्राधिकरण समितीचे उमाकांत मिटकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी म्हटले की पर्यावरणाचा समतोल टिकवुन ठेवण्यासाठी एक व्यक्ती एक झाड हा उपक्रम राबविणे गरजेचे आहे. जिल्ह्यात पोलिस विभागाच्या वतीने ५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वृक्ष लागवड करण्याबरोबरच लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. आज सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे. सेंद्रिय शेतीमुळे माणसाचे आयुष्यमान वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही मोठी वाढ होते. आज धाराशिव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्या केल्याचे पाहुन दुःख वाटते. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती केली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील. कारण बाजारात सेंद्रिय शेतीतुन काढलेल्या मालाला भाव चांगला मिळतो असेही पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

 यावेळी पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी पोलिस भरतीसाठी प्रयत्न करीत असलेल्या विद्यार्थ्यांना अतीशय मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडुन मोफत ट्रेनिंग देण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक पोलिस ठाण्यात ग्रंथालय सुरू करून विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठीही मोफत  मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही यावेळी पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

 पोलिस तक्रार प्राधिकरण समितीचे उमाकांत मिटकर यांनी पोलिस अधीक्षकांचा परीचय करून देतांना पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांचा उल्लेख वृक्ष साहेब असा केला. कारण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे वृक्षप्रेमी असुन वृक्ष लागवडीचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. ते ज्या ठिकाणी नोकरीला असतील त्याठिकाणचा परीसर ते हिरवागार करतात असे उमाकांत मिटकर यांनी म्हटले आहे.पाहुण्यांना मंदिराची संपुर्ण माहिती मंदिर समितीचे सचिन डुकरे यांनी करून दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पोलिस तक्रार प्राधिकरण समितीचे उमाकांत मिटकर, बलभीमराव मुळे, मंदिर समितीचे प्रभाकर घोडके, पत्रकार विलास येडगे व रामतीर्थचे माजी सरपंच दामाजी राठोड हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार सचिन डुकरे यांनी मानले.

 या कार्यक्रमास नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, सुधीर मोटे, कर्मचारी, रामभक्त व पोलिस भरतीसाठी सराव करीत असलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंदिर समितीचे सचिन डुकरे, ऍड. धनंजय धरणे, श्रमिक पोतदार, प्रभाकर घोडके यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी परीश्रम घेतले.


 
Top