उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातचे पिक गेले आहे. शासनाने वारंवार घोषणा करूनही शेतकर्‍यांना अनुदान मिळालेले नाही, या संदर्भात शासनाला वेळोवेळी लेखी विनंती करूनही अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे हे अनुदान मिळावे, या व इतर मागण्यांसाठी बुधवारी सरकारच्या निषेधार्थ बुधवारी (दि.23) सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत सोमवारी (दि.21) जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे

राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगाकवर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे सोयाबीन हे मुख्य पीक अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे हातचे गेले आहे. शासनाने वारंवार घोषणा करून अजूनही शेतकर्‍यांना अनुदान मिळालेले नाही. याबाबत सतत पाठपुरावा करून शेतकर्‍यांचे अनुदान जमा झालेले नाही. त्यामुळे सतत अडचणीत असलेला शेतकरी अडचणीमध्येच येत आहे. मागील दोन महिन्यात जिल्ह्यातील 14 शेतकर्‍यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या आहेत. या संदर्भात शासनाला वेळोवेळी लेखी विनंती करूनही अनुदान मिळालेले नाही. या व इतर मागण्यांच्या हे निदर्शने आंदोलन करून शासनाचा लोकशाही मार्गाने निषेध करण्यात येणार आहे. या निवेदनात जुलै ते ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत 281 कोटी रुपये उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांना त्वरित उपलब्ध करून वाटप करण्यात यावे, जिल्ह्यातील गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतील 100 हून अधिक कुटुंबाला गेल्या सात महिन्यापासून शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे ते थांबून त्यांना अपघात विमा त्वरित मंजूर करून वाटप करण्यात यावा. जिल्ह्यातील रब्बी हंगाम सुरू झाला असून शेतकरी पिकांना पाणी देत असताना विद्युत वितरण कंपनी थकीत वीज बिलापोटी अचानक डीपी बंद करत आहे. ते थांबून शेतकर्‍यांना आठतास पूर्ण क्षमतेने वीज उपलब्ध करून द्यावी. उस्मानाबाद आयुर्वेदिक महाविद्यालयातील पदवीधर प्रवेश क्षमता 25 ने घटविले असून ती पूर्ववत करून जागा त्वरित भरण्यात याव्यात. टेंभुर्णी लातूर रोडचे बहुचर्चित चौपदरीकरण ताबडतोब सुरू करण्यात येऊन कळंब, उस्मानाबाद तालुक्यातील इतर रोडवरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असून आंदोलनात शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केले आहे.

 
Top