उस्मानाबाद / प्रतिनिधी-

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला पाठींबा देण्यासाठी शहरात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या उस्मानाबाद शहर पदयात्रेत भाजप वगळता अन्य पक्षांनी आपसात मोट बांधली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेकापचेही नेते यात्रेत सहभाग झाले होते. आगामी निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात एकत्रित निवडूका लढवण्याचे संकेत दिल्याची चर्चा शहरात होती.

 काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशभरात भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. आता राज्यातही या यात्रेचे आगमन होत आहे. या यात्रेला पाठींबा देण्यासाठी शुक्रवारी शहरात उस्मानाबाद शहर पदयात्रा आयोजित करण्यात आली. याची सुरुवात जिजाऊ चौकातून करण्यात आली. यावेळी काँग्रेसनेते माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धिरज पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, जिल्हाउपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे या काँग्रेस नेत्यांसोबत शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जनता बैंकेचे माजी चेअरमन िब्रजलाल मोदाणी, राजेंद्र शेरखाने, प्रकाश आष्टे, डॉ. स्मिता शहापूरकर, राज कुलकर्णी,  पालिकेतील माजी गटनेते सोमनाथ गुरव, शेकापचे एम. डी. देशमुख, धनंजय पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अय्याज शेख, वाजिद पठाण आदी काँग्रेसह सर्व पक्षाचे नेते उपस्थित होते.

काँग्रेसच्या नेत्यांसोबत अन्य पक्षाचे नेते अर्धवेळ तर काही पूर्णवेळ पदयात्रेत सहभागी झाले होते. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांनी आपला एकसंघपणा दाखवल्याची शहरात चर्चा होती. भाजपच्या विरोधात यापुढील निवडणूकांमध्ये एकत्रित लढा देण्याचे संकेत या सर्व पक्षीय नेत्यांनी दिल्याचे शहरात वातावरण होते. दरम्यान, यात्रेचा समारोप शहरातील मदिना चौकात करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या विविध नेत्यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी केले. आभार काँग्रेसचे खलिल सय्यद यांनी मानले.


 
Top