उस्मानाबाद (प्रतिनिधी)–शिंदे–फडणवीस सरकारने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, सर्वसामान्य गोरगरिबांची दिवाळी यंदा अभूतपूर्व मदतीने आनंदाचा शिधा देवून गोड केल्याचा सर्वोच्च आनंद झाल्याचे प्रतिपादन आ.  राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले. धाराशिव (उस्मानाबाद) तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथे दीपावली पाडवा व भाऊबीजच्या मुहूर्तावर  आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते आनंदाचा शिधा किटचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

सारोळा येथील श्री रामप्रभू व श्री हनुमान मंदिरामध्ये मंगळवारी (दि.२६) हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मा. उच्च व मा. सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन पीक विम्याची लढाई जिंकत शेतकऱ्यांना ५०० कोटी पेक्षा अधिक पिक विमा मंजूर करून यातील रुपये २०१ कोटी प्राप्त केल्याबद्दल सारोळा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आदरपूर्वक भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, मागील अडीच वर्ष शेतकरी,  शेतमजूर, कामगार, कष्टकरी, सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची पिळवणूक झाली. आघाडी सरकारने सर्व घटकांना वाऱ्यावर सोडले. शेतकरी, शेतमजुरांना दमडीची ही मदत दिली नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील एकही महत्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावला नाही. परंतु राज्यात अवघ्या तीन महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपा- सेना महायुतीच्या नेतृत्वा खालील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारने उस्मानाबाद जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, तुळजापूर येथील प्रसाद योजनेतून विविध विकास कामे हिमतीने मार्गी लावली आहेत. तसेच शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे  ९० कोटी, सततच्या पावसाचे १५४ कोटी तर २०२० च्या पीक विम्याची न्यायालयीन लढा देऊन ५०० कोटी आपण मंजूर करून घेतले आहेत. यापैकी रुपये २०१ कोटी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात यश आले आहे.  दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर ही पैसे जमा होणार आहेत.

प्रोत्साहनपर अनुदानातून शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये सरकारकडून दिले जात आहेत. जिल्ह्यातील तब्बल ७१ हजारपेक्षा अधिक शेतकरी बंधू -भगिनींना याचा लाभ मिळत आहे. त्यामुळे यावर्षी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे शेतकरी,  शेतमजूर, कामगार,  कर्मचारी, सर्वसामान्य, गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात मदत देण्यात आल्याने यंदा सर्वांचीच दिवाळी अभूतपूर्व उत्साह, आनंदी व गोड झाली आहे .पीक विम्याचे रुपये ५३१ कोटी, तसेच अतिवृष्टीचे ४५० कोटी पेक्षा जास्त, खरीप २०२१ चे जवळपास रुपये ४०० कोटी असे साधारणत: १५०० कोटी रूपये पेक्षा अधिक नुकसान भरपाई रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

या सोहळ्यास सरपंच श्री प्रशांत रणदिवे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री सुरेश भाऊ देवगीरे, पत्रकार श्री धनंजय रणदिवे, रमेश आप्पा रणदिवे, जीवन भाऊ पाटील, सोसायटीचे चेअरमन श्री श्रीकृष्ण उर्फ भाऊसाहेब रणदिवे, व्हाईस चेअरमन अॅड. महावीर देवगिरे,  संचालक श्री अरुण मसे, श्री गौतम बप्पा रणदिवे, संचालक अमर बाकले, ज्योतीराम रणदिवे,  ग्रा.पं.सदस्य नितीन दादा पाटील, सुधाकर देवगिरे, डॉ बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे संचालक सुजीत बाकले, पांडुरंग कठारे गुरूजी, भालचंद्र कठारे, रावसाहेब मसे, पांडुरंग कुदळे, भागवत जटाळे, पंडित खरे, खंडू शिंदे, सुरेश शिंदे तसेच शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बाजीराव जाधवर सर तर आभार सरपंच श्री रणदिवे यांनी व्यक्त केले.

 
Top