उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने स्टार्टअप स्पर्धेचे जिल्हा स्तरीय आयोजन कण्यात आले होते. ही स्टार्ट अप यात्रा स्पर्धा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. कृषी, शिक्षण, आरोग्य,  कचरा आणि पाणी व्यवस्थापन, ई प्रशासन. स्मार्ट पायाभूत सुविधा तसेच इतर अशा विविध विभागामध्ये स्टार्टअप प्रस्ताव मागवण्यात आलेल होते. त्या प्रस्तावांचे सादरीकरण करण्यात आले.

 या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. जयसिंगराव देशमुख होते. अध्यक्ष म्हणून विद्यापीठ उप परिसराचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड हे होते. या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त  संजय गुरव, लघु उद्योग भारती मराठवाडा आणि उद्योजक संजय देशमाने, व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव, लघु उद्योग भारती उस्मानाबादचे निशांत होणमुटे, आवताडे सर, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी आणि  रिझवान कपूर उपस्थित होते.  सहायक आयुक्त संजय गुरव यांनी प्रास्ताविक करुन स्टार्टअप बाबत शासनाचे धोरण, योजना स्वरुप, सादरीकरणाबाबत माहिती दिली. तर प्रमुख पाहुण्यांनी उद्योग वाढीसाठी किंवा सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी नवीन दृष्टीकोन ठेवल्यास नवीन कल्पना सुचल्या जातात. नवीन कल्पना या मार्केट मधील गरजा आणि प्रश्न घेऊन विद्यार्थ्यांनी सोडवाव्यात असे मार्गदर्शन केले.

 द्वितीय सत्रात निर्देशक किरण झरकर यांनी स्टार्टअप बद्दल माहिती दिली. रिजवान कपूर यांनी स्टार्टअप यात्रा आणि सादरीकरण याबाबत मार्गदर्शन केले. या स्टार्टअप जिल्हा स्तरीय स्पर्धेत 46 स्पर्धकांची नोंदणी झाली होती. यातील 24 स्टार्टअप प्रस्तावांची मांडणी केली. यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिके काढली आहेत. यांना अनुक्रमे 25 हजार, 15 हजार आणि 10 हजार असे बक्षीस दिले जाणार आहे.

 या सर्व स्टार्टअप सादरीकरणाचे महाराष्ट्र स्टेट इनोवेशन सोसायटी मार्फत घालून दिलेल्या निकषावरती मूल्यमापन केले गेले. या सादरीकरणाचे मूल्यमापन करण्यासाठी उद्योजक  संजय देशमाने, तंत्र शिक्षण विभागाचे प्रा. पंके सर, डी.आय.सी. चे  एन. पी. जावळीकर, व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव आणि गट निर्देशक मनोज चौधरी यांची समिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गठीत समितीने केले. अत्यंत उपयुक्त आणि उद्योग वाढीस बळ देणाऱ्या कल्पना सादर केल्या गेल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विक्रम शिंदे तर आभार प्रा. वरून कळसे यांनी मानले आणि कार्यक्रम नियोजन हे प्रा. सचिन बस्सैये यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कौशल्य विकास आणि विद्यापीठ उपपरिसर मधील शिक्षक तसेच शिकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी कार्य केले. या स्टार्ट अप स्पर्धेचे विजेते प्रथम क्रमांक श्री. दीपक पौळ (क्षेत्र कृषी), द्वितीय श्री. उमेश दुधभाते ( आय टी सर्विसेस), तृतीय श्री. श्रीकांत बिक्कड ( क्षेत्र कृषी) आदी घोषित करण्यात आले.


 
Top