तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील माळुंब्रा येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रातून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले असून या उपकेंद्रातून सातत्याने कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वारंवार नागरिकांनी तक्रार करूनही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे ग्राहकातून संताप व्यक्त केला जात आहे.

 सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे अशातच कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे घरातील सर्वच विद्युत उपकरणे बंद पडली आहेत. विद्युत फॅन बंद असल्यामुळे डासांनी उच्छाद मांडला असुन यामुळे आजरांचे प्रमाण वाढले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन वीज ग्राहकांचे होणारे हाल थांबवावे तसेच माळुंब्रा येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रा अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


 
Top