उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जनावरांमधील लंम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गीक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमानुसार लंम्पी चर्म रोगावर नियंत्रण प्रतिबंध किंवा त्यांचे निर्मुलन करता येईल आणि गोजातीय प्रजातीची सर्व गुरे आणि म्हशी ज्या ठिकाणी ते पाळले किंवा ठेवले जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने आण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

 गोजातीय प्रजातीची बाधीत असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे आणि म्हशी गोजातीय प्रजातीच्या कोणत्याही बाधीत झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण पाण्याच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात आली आहे.

 गोजातीय प्रजातींची गुरे आणि म्हशींचा कोणत्याही प्राण्यांचा बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन भरवणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातींच्या प्राण्यांचे गट करुन किंवा त्यांना एकत्रित करुन कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे.

 नियंत्रित क्षेत्रामधील बाजार पेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या लंपी झालेल्या गुरांना आणि म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जारी केले आहेत.

 लंम्पी स्किन रोगाच्या अंमलबजावणी करण्याकरिता यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये महसूल विभागाकडे जिल्ह्यातील कार्यान्वयीन यंत्रणाच्या मदतीने रोग नियंत्रण करणे, जनावरांचा बाजार, प्राण्यांच्या शर्यती, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि प्राण्यांचे गट कार्यक्रम पार पाडणे यास प्रतिबंध करणे आदींची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

 पोलिस यंत्रणेकडे जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेर जनावरांची होणारी वाहतूक प्रतिबंधीत करणे, आदेशांचे पालन न करणाऱ्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही करणे आदींची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील जनावरांची होणारी वाहतूक प्रतिबंधीत करणे आदी कामांची जबाबदारी निश्चीत करण्यात आली आहे.

 ग्रामविकास विभागाकडे लंम्पी स्किन रोगाबाबत गावांमध्ये जागृती करणे, सतर्कता बाळगणे, गावामध्ये या रोगाबाबत काही माहिती मिळाल्यास नियंत्रण कक्षास कळवणे, गोट्यामध्ये किटकनाशकची फवारणी करणे. मृत जनावरांची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणे आणि ग्रामसभा मध्ये विषय चर्चा करणे आदी कामांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

 भुमी अभिलेख विभागाकडे रोग प्रादुर्भाव झाल्यास ईपी सेंटर पासून पाच कि.मी. च्या अंतरातील गावाचा नकाशा तयार करणे आणि पशुसंवर्धन विभागास देणे आदी कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाकडे लंम्पी स्किन रोगाचे जनावर आढळल्यास योग्य ते उपचार करणे, विलगीकरण करणे, नमुने गोळा करुन तात्काळ प्रयोगशाळेस पाठवणे. आजारी प्राण्यांचा दैनंदिन अहवाल तयार करणे. नमुने होकारार्थी आल्यास पाच कि.मी.त्रिजेच्या गावामध्ये लसीकरण करणे आदी कामांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

 नगरपरिषदेच्या सर्व मुख्याधिकाऱ्यांकडे लंम्पी स्किन रोगाबाबत शहरामध्ये जागृती करणे, सतर्कता बाळगणे, शहरामध्ये या रोगांबाबत माहिती मिळाल्यास नियंत्रण कक्षास कळवणे. गोठ्यामध्ये किटकनाशकाची फवारणी करणे. मृत जनावरांची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणे. मोकाट जनावरांवर नियंत्रण एकत्रित करुन जनावरांची सोय कोंडवड्यामध्ये करणे आदीं कामांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

 जिल्हा सहनिबंधक सहकारी संस्थाकडे कृषी उत्पन्न बाजार समितीत प्राण्यांचे सर्व प्रकारचे खरेदी विक्रीचे बाजार भरवण्याबाबत बंदी घालणे, जनावरे खरेदी-विक्रीसाठी एकत्रित न आणणे आदी कामांची जबाबदारी निश्चीत करण्यात आली आहे. तरी संबंधित सर्व यंत्रणांनी निश्चित करण्यात आलेल्या जबाबदारी प्रमाणे कार्यवाही करावी तसेच या आदेशांची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, असेही श्री. दिवेगावकर यांनी आदेशात म्हटले आहे.

 
Top