उस्मानाबाद /प्रतिनिधी -

 जिल्हा स्त्री रुग्णालयातील स्वच्छतागृहातच महिलेची प्रसुती झाल्याची घटना चव्हाट्यावर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य सेवा कशी विस्कळीत झाली आहे? हे या निमित्ताने स्पष्ट झाले असून अपुऱ्या सुविधा वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तोकड्या संख्येमुळे सर्वसामन्य कुटुंबातील महिलांना आरोग्यसेवा घेताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ना. सावंत स्त्री रुग्णालयातील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी लक्ष देतील काय ? असा सवालही नागरिकातून उपस्थित होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नारीवाडी येथील रुक्मिणी सुतार या मंगळवारी (दि.२३) प्रसुतीसाठी उस्मानाबाद येथील शासकीय स्त्री रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या.त्यांना रुग्णालयात योग्य प्रकारे आरोग्य सेवा मिळाली नाही. रुग्णालयात मोठी गर्दी असल्याने त्यांना बेड उपलब्ध होणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ताटकळत थांबावे लागले. दरम्यान त्यांना कळा सुरू झाल्याने त्या रुग्णालयातील स्वच्छतागृहात गेल्या असता तिथेच त्यांची प्रसुती झाली व बाळ जन्माला आले. त्यानंतर तरी रुग्णालय प्रशासनाकडून या महिलेस योग्य आरोग्य सेवा मिळणे अपेक्षीत होते परंतु संबंधित डॉक्टर एक तास रुग्णालयात आलेच नाहीत. मुलगा झाल्याने सुतार यांना आनंद झाला परंतु त्यांना योग्य आरोग्य सेवा न मिळाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ डी के पाटील यांचा खुलासा 

   येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात काल ( दि .23 ऑगस्ट2022 ) महिलेची प्रसुती स्वच्छतागृहामध्ये झाली तसेच रुग्णास खाट उपलब्ध झाले नसल्याबाबत प्रसार माध्यमात बातमी प्रसिध्द करण्यात त्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के.पाटील यांनी खुलासा केला आहे.

या खुलाशानुसार 19 वर्षाची महिला रात्री 10.35 वाजता दाखल झाली . तिची तपासणी स्त्री रोग तज्ज्ञांच्यामार्फत करण्यात आली . तिच्या आवश्यकता तपासण्या करण्यात आल्या.रुग्णास तपासून तिला प्रसुती कक्षातून प्रसुतीपूर्व कक्षात दाखल करण्यात आले.मध्यरात्री 12.10 वाजता तिची पुन्हा तपासणी करण्यात आली.तिला सतत कळा येत होत्या . ती बाथरुमला जात असताना प्रसुती गृहातील स्वच्छतागृहाच्या दरवाज्या समोर तिची प्रसुती झाली. प्रसुतीगृहातील स्टाफ नर्स यांनी त्वरित योग्य ते उपचार दिले.आई आणि बाळाची प्रकृती चांगली आहे. रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून बाळाच्या आईच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्यात येत आहे, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पाटील यांनी कळविले आहे.


 
Top