लातूर   ( प्रतिनिधी ) –

लातूर मधील जेष्ठ कलावंत व संगीत तज्ज्ञ  किरण भावठाणकर यांनी लिहिलेल्या  ‘ आयी चांदनी रात ‘ या चरित्रात्मक पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी एका सांगीतिक मैफीलित करण्यात आले . आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

       थोर संगीत तज्ज्ञ संगीत प्रसारक व प्रचारक , संगीत महामहोपाध्याय पंडित स. भ. देशपांडे यांच्या जीवन प्रवासावर व सांगीतिक कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या ‘ आयी चांदनी रात ‘ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अष्टविनायक मंदिर जवळील गणेश हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. संगीत क्षेत्रातील मराठवाड्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व सूरमणी पंडित कमलाकरराव परळीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास मंचावर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष पंडित विकास कशाळकर ( मुंबई ) ,उपाध्यक्ष पंडित पांडुरंग मुखडे , डॉ. देवेंद्र कुलकर्णी , स.भ. देशपांडे यांचे जावई विलासराव बामणोदकर , मुलगी सौ वैशालीताई बामणोदकर , आवर्तन संगीत सभा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा , लेखक किरण भावठाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामहोपाध्याय पंडित स.भ. देशपांडे यांनी रचलेल्या बंदिशींचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये सुरुवातीला परभणी येथील विश्वाम परळीकर यांनी मधमाद सारंग या रागातील आज मोरे घर आओ …ही तीनतालातील बंदिश सादर केली, त्यानंतर लातूर मधील डॉ. वृषाली देशमुख यांनी शुद्ध कल्याण रागातील  ‘ पायलिया बाजे मोरी झननन…’ ही तीन तालातील बंदिश सादर केली.  शेवटी या पुस्तकाचे लेखक  किरण भावठाणकर यांनी मधुकंस रागातील ‘ आयी चांदनी रात ‘ ही तीनतालातील बंदिश सादर करून या सर्व कलावंतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या सर्व कलावंतांना तबला साथ लातूर मधील युवा कलावंत  तेजस धुमाळ यांनी तर संवादिनी साथ प्रा. शशिकांत  देशमुख यांनी अतिशय समर्पकपणे केली.

        पंडित विष्णू दिगंबर पलूसकरांच्या पठडीतील त्यांचे जेष्ठ शिष्य पंडित विनायक बुवा पटवर्धन यांचे पट शिष्य म्हणून पंडित स. भ. देशपांडे मास्तर यांचे नाव घेतले जाते. गांधर्व मंडळाच्या कार्याचा विस्तार संपूर्ण देशभरात करण्यात स. भ. देशपांडे यांचे महत्त्वाचे योगदान मानले जाते. सोमवारी त्यांची १२६ जयंती होती . याचे औचित्य साधून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या या चरित्रात्मक पुस्तकाचा विमोचन सोहळा व संगीत मैफिल आयोजित करण्यात आली होती. यावेळी स. भ. देशपांडे यांचे जेष्ठ शिष्य व ख्यातनाम जेष्ठ कलावंत सूरमणी पंडित कमलाकरराव परळीकर , पंडित विकास कशाळकर , सौ वैशालीताई बामणोदकर आदींनी देशपांडे मास्तरांच्या काही आठवणी , विचार सांगत देशपांडे मास्तरांना स्वरांजली अर्पण केली. 

      पंडित विकास कशाळकर यांनी या पुस्तकाच्या निर्मितीमुळे नवीन पिढीला देशपांडे मास्तरांचा इतिहास, त्यांची संगीत तपश्चर्या , साधना कळण्यास मदत होणार आहे .संगीत ही एक अशी कला आहे की ती प्रत्येकाला मोक्षाकडे घेऊन जाते. संगीतातून माणसाला मोक्षप्राप्तीचा आनंद घेता येऊ शकतो , असे ते म्हणाले. पुस्तकाचे लेखक किरण भावठाणकर यांनी आपल्या मनोगतात स.भ. देशपांडे यांच्यावर आधारित ‘आयी चांदनी रात ‘ या चरित्रात्मक पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विषद केली.  गुरुवर्य पंडित कमलाकरराव परळीकर यांच्या मार्गदर्शनातून , प्रेरणेतून व आग्रहातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे , याबद्दल परळीकर सरांचे ऋणही त्यांनी व्यक्त केले . 

       आवर्तन संगीत सभेचे प्रणेते प्रा. शशिकांत देशमुख यांनी प्रास्ताविक भाषण करून मान्यवरांचा परिचय करून दिला . प्रारंभी स.भ. देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून  दीप प्रज्वलन करण्यात आले. पांडुरंग मुखडे,  सौ वैशाली बामणोदकर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले .सूरमणी पंडित कमलाकरराव परळीकर यांनी अध्यक्षीय समारोप केला .सौ विपुला देशमुख-  भावठाणकर यांनी पसायदान म्हटले. आरोह संगीत अकादमीच्या शिष्यांनी गुरुवंदना सादर केली. प्रा. संदीप जगदाळे यांनी आभार मानले .यावेळी लेखक किरण भावठाणकर यांच्या मातोश्री मंदाकिनी भावठाणकर तसेच कमलाकर परळीकर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला परळीकर यांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी लातूरमधील ज्येष्ठ कलावंत सूरमणी पं.बाबुराव बोरगावकर, पंडित विठ्ठलराव जगताप, पंडित शिवरुद्र स्वामी प्रा. विजयकुमार धायगुडे , इत्यादीं सह अनेक मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  मुकुंद मिरगे यांनी अतिशय योग्य वाणीमध्ये केले.

 
Top