उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण आणि इतर योजनांतर्गत दुधाळ जनावरांच्या (गाई-म्हशी) वाटप करण्यासाठी जिल्हानिहाय पॅनल तयार करण्यात येणार आहे. या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्याकरिता  2022-23 या वर्षामध्ये राज्यस्तरीय नाविण्यपुर्ण आणि इतर योजनांतर्गत दुधाळ जनावरांच्या (गाई-म्हशी) वाटप करण्यासाठी जिल्हानिहाय पॅनल तयार करण्यासाठी  जिल्ह्यातील पुरवठादारांनी दि. 15 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करावे. दि. 01 ऑगस्ट 2022 ते 31 जुलै 2023 या कालावधीकरिता पुरवठा करण्यात येणाऱ्या जनावरांसाठी दि. 15 सप्टेंबर 2022 पर्यंत जनावरे पुरवठादारांनी येथील जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय  यांच्याकडे जमा करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे.

 पुरवठादार व्यक्ती,संस्था,कंपनी,फार्म यांच्याकडे कृषी उत्पन्न समितीचा जनावरांच्या बाजाराचा परवाना आणि जनावरे खरेदी विक्रीचा किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे, पुरवठादारास शासनाने मंजुर केलेल्या दराप्रमाणे दुधाळ जनावरांचा पुरवठा करावा लागेल. तथापि, लाभार्थी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणि खरेदी समितीने वाढीव किमतीचे दुधाळ जनावर खरेदी करावयाचे ठरविल्यास अधिकची रक्कम लाभार्थीकडून स्वतंत्ररित्या वसूल करावी लागेल,पुरवठादाराने पैदासीसाठी  दुध उत्पादनासाठी अयोग्य जनावरे (गाई-म्हशी) पुरवठा करण्याकरिता सादर करु नयेत, असे आढळुन आल्यास सदरचा करार रद्द करणेत येईल आणि त्याचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. एखाद्या विभागाच्या जिल्ह्याच्या अधिकृत पुरवठादाराने पशुधनाचा विहीत कालावधीत पुरवठा न केल्यास आणि अन्य विभागाचा, जिल्ह्याचा अधिकृत पुरवठेदार मंजुर दराने दुधाळ जनावरांचा (गाई-म्हशी) पुरावठा करण्यास तयार असतील तर त्यांच्याकडून खरेदी करण्यात येईल याबाबत कोणतीही तक्रार करता येणार नाही,

 प्रत्येक जिल्ह्यातील जनावरांच्या प्रचलित बाजारातून लाभधारकांच्या पसंतीने तसेच खरेदी समितीच्या उपस्थितीत दुधाळ जनावरांची खरेदी करण्यात येईल. पॅनलमध्ये सामाविष्ट असलेल्या अथवा पॅनलमध्ये सामाविष्ट करण्यासंदर्भात किंवा इतर कोणतेही वाद निर्माण झाल्यास त्याचा निपटारा मा. प्रधान सचिव (पदुम), मंत्रालय, मुंबई यांच्याकडे अपील करता येईल. अर्जदाराने 2018-19, 2019-20 आणि  2020-21 या कालावधीचे आयकर विवरण पत्र सादर करणे तसेच दुधाळ जनावरे वाटप करताना पुरवठादाराने स्वत: उपस्थित राहणे बंधनकारक राहील, कोणत्याही प्रतिनिधीची नियुक्ती करता येणार नाही. अर्जदाराने पुरवठादार असल्याचे तसेच यापुर्वी किमान तीन वर्षे अशा प्रकारच्या खरेदी-विक्रीच्या अनुभवाचे प्रमाणपत्र सादर करावे. तसेच मागील तीन वर्षामध्ये किती दुधाळ जनावरांची खरेदी केली याबाबतची कागदपत्रे आणि त्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे खरेदी-विक्रीचे अधिकृत आकडे सादर करावेत. दर वर्षी किमान 25 लाखांचा खरेदी – विक्रीचा व्यवहार केलेला असल्याचा दाखला, आवश्यकता पडल्यास इतर राज्यातून दुधाळ जनावरे आणण्याची व्यवस्था पुरवठादारास करावी लागेल. जेणेकरुन पुरवठ्याची साखळी अबाधित राहील. त्याचा खर्च पुरवठादाराला करावा लागेल.

  स्वत:  निवड करण्यात आलेल्या पुरवठादाराने विहीत कालावधीत दुधाळ जनावरे उपलब्ध करुन न दिल्यास पुरवठा आदेश दिल्याच्या दिनांकापासून 15 दिवसानंतर पुरवठादारास करारनाम्यामध्ये विहित केल्याप्रमाणे दंड आकारण्यात येईल.केंद, राज्य शासनाचे सर्व संविधानित कर अदा करण्याची जबाबदारी पुरवठादाराची राहील. पुरवठादाराने दुधाळ जनावरांचा पुरवठा केल्यानंतर त्यांनी बाजार पावती किंवा देयक / Invoice/Bill हे  Printed अधिकृत स्वरुपाचे असणे आवश्यक आहे.

 या सर्व बाबींची पुर्तता करणाऱ्या इच्छुकांनी 30 दिवसांच्या आत येथील  जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय  यांच्याकडे  अर्ज करावा, तसेच अर्ज  आणि करारनाम्याचा नमुना कार्यालयात   उपलब्ध होतील, असेही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी कळविले आहे.


 
Top