उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  आईचे दूध बाळासाठी नैसर्गिक पुर्णान्न आहे. स्तनपान हा बाळाचा हक्क आहे. त्यापासून बाळाला वंचित ठेवू नये, नवजात बाळास जन्मानंतर एक तासाच्या आत स्तनपानास सुरुवात करावे. चिकाचे दूध बाळास आवश्य द्यावे. बाळास पहिले सहा महिने वयापर्यंत निव्वळ स्तनपान म्हणजे केवळ आईचे दूध द्यावे. त्यानंतर पुरक आहार सुरु केल्यावरही दोन वर्ष वयापर्यंत स्तनपान सुरु ठेवावे, असे आवाहन येथील जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

  दरवर्षी 1 ते 7 ऑगष्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. स्तनपानाच्या पध्दती सुधारण्याच्या प्रयत्नांना बळ देणे, हा यामागचा हेतू आहे. यावर्षीच्या जागतिक स्तनपान सप्ताहासाठी “ स्तनपानाच्या प्रगतीचे पाऊल” “शिकवू या आणि आधार देऊ या” हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे. NFHS-5 च्या 2019-20 मधील सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये केवळ 53.2 टक्के नवजात बालकांना जन्मानंतर एक तासाच्या आत स्तनपान देण्यास सुरुवात करण्यात आली व 71 टक्के बालकांना जन्मानंतर पहिले सहा महिने निव्वळ स्तनपान देण्यात आले. हे प्रमाण पाहता आजही समाज स्तनपानाच्या अमृतानुभवाबाबत म्हणावा तेवढा जागरुक नाही असे दिसून येते. नवजात बालकास जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपान सुरु करणे आणि पहिल्या सहा महिन्यात केवळ आईचे दुध म्हणजेच निव्वळ स्तनपान देण्याचे महत्व अपार आहे. त्यातही चिकाच्या दुधाचे औषधी आणि पौष्टिक गुण तर अत्यंत वाखाणण्यासारखे आहेत. ज्याला बाळाची पहिली लस असेही संबोधले जाते.

 स्तनपानाचे तिहेरी फायदे आहेत :-

 बाळाला फायदे : बाळाला संपुर्ण आहार मिळतो, सहज पचन होते, रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते, त्यामुळे जंतुसंसर्गापासून संरक्षण मिळते तसेच शारिरीक आणि बौध्दिक विकास होतो. जबडयाच्या विकासास मदत होते. आईचे दूध सहज आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते.

 मातेला फायदे :गर्भाशय पुर्वस्थितीत येण्यास मदत होते,गर्भधारणा टळते, स्तन आणि ओव्हरीच्या कर्करोगाची जोखीम कमी होते. दूध गरम करणे किंवा निर्जंतुक करण्याची आवश्यकता नसल्याने मातेचा वेळ वाचतो.

 कुटुंब आणि समाजाला फायदे :पैशाची बचत होते. नैसर्गिकरित्या कुटुंब नियोजनास मदत होते.दवाखान्याची गरज कमी होते.  कुपोषण कमी करण्यास मदत होते. बालमृत्यू टाळता येतात.

 आजही काही प्रमाणात बाळाबाबत चुकीच्या बाबी घडताना दिसतात, ज्यामध्ये चिकाचे दूध फेकून देणे, मधाचे बोट चाटवणे, बॉटल मधून दूध देणे, मिल्क फॉर्मुला पावडरचा अधिक वापर करणे या चुकीच्या बाबींचा समावेश आहे.स्तनपानाच्या पद्धती सुधारण्याच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी प्रत्येक दवाखान्यामध्ये स्तनपानाबाबत निश्चित धोरण आखण्यात आले आहे. यशस्वी स्तनपानाच्या दशपदीचा अवलंब करण्यात येतो. यासाठी सर्व आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे.

  यशस्वी स्तनपानासाठी मातेला प्रसुतीपूर्व आणि प्रसुती पश्चात मार्गदर्शन केले जाते. स्तनपानाची योग्य आणि आरामदायी पध्दत मातेला शिकवण्यात येते. आशा स्वयंसेविकांमार्फत गृहभेटीमधून याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शनही केले जाते. बाटली, मिल्क फॉर्मुला पावडर फुड वापराबाबतच्या जाहिरातींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी उदा. बसस्थानक, रेल्वे स्टेशन इ. ठिकाणी स्तनपानास मदत होण्यासाठी हिरकणीकक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ब्रेस्टमिल्क बँक संकल्पना रुजवण्यात येत आहे. इत्यादी अनेक प्रकारे स्तनपानासाठी प्रयत्न केले जातात.

 यावर्षीच्या जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने समाजाने स्तनपानाबाबत जागरूक होऊन त्याच्या योग्य पध्दती अंगिकाराव्यात आणि बाळाला त्याचा हक्क मिळवून द्यावा असे आवाहनही सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.


 
Top