उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ध्येयवादी मंडळीच्या माध्यमातूनच आता पर्यंत मराठवाडा जनता विकास परिषदेचे काम केले जात आहे. काळ बदलल्याने नव्या विचाराचे तरुण मराठवाडा विकास परिषदेत मध्ये सामिल होवून आपल्या जिल्ह्याचा निश्चित विकास साधण्याचे आवाहन मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केले. डॉ. काब्दे रविवारी (दि.10) उस्मानाबादेतील  छत्रपती शिवाजी हायस्कुलमध्ये आयोजित केलेल्या मराठवाडा जनता विकास परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष श्री रोडे, जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, सचिव संतोष हंबीरे, श्री. रेणके (उमरगा) अ‍ॅड) रेवण भोसले, सदस्य उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना डॉ. काब्दे म्हणाले. गोविंदभाई श्रॉफ संपुर्ण मराठवाड्यात फिरत असताना योग्य तरुणाईचा शोध घेवून त्यांचा सहभाग वाढवुन नेतृत्व देत असत त्यातून प्रलंबीत प्रश्नांना मार्गक्रम करण्यासाठी दिशा निर्देश देत असत. उस्मानाबाद जिल्हा मागासलेला  असून विकास करण्यासाठी प्रश्नांचा सखोल अभ्यास करायला पाहिजे. त्यासाठी अभ्यासमंडळ तयार करुन जिल्ह्याचे प्रश्न विकासाचे प्रश्न सर्व पातळीवर मांडून सोडवायला पाहिजे. जिल्हा शाखेने तालुका पातळीवर शाखा तयार करुन प्रश्न मांडून सोडवावे लागतील. वैधानिक विकास मंडळाची 2020 ला मुदत संपल्यानंतर मराठावडा विकास परिषदेने राज्यपाल, मुख्यमंत्र्याकडे सतत पाठपुरावा केला आहे. तो पुर्ण होत नाही तोपर्यंत मराठवाड्यातील सर्व जनतेने मोठा लढा उभारण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली.

वैधानिक विकास मंडळामार्फत राज्यपालांनी समान निधी वाटपाच्या 371/ घटनेच्या कलमा प्रमाणे समान निधी द्यावा अशी मागणी त्यांनी केली. मराठवाड्यावर अन्याय होणार नाही यासाठी विभागीय पातळीवर ज्या समिती स्थापन केल्या होत्या त्या समितीचा अहवाल लागू करुन उद्योग, सिंचन, आरोग्य, शिक्षण व मराठवाड्यातील अनुशेष भरुन काढण्यासाठी निधी देण्याची मागणी डॉ. काब्दे यांनी केली.

या बैठकीत उस्मानावबाद मराठवाडा परिषदेचे जिल्हा अध्यक्ष धनंजय पाटील यांनी जिल्हयात मोठ्या प्रमाणात सिंचनाचे काम झाले आहे. आणखी मोठ्या प्रमाणात सिंचन क्षेत्र वाढवुन शेतकर्‍यांचे हित लक्षात घेवून पाणी वाटप झाले पाहिजे. शेती मालाला योग्य भाव दिला पाहिजे. या संपूर्ण  कामासाठी जनतेने परिषदेत सहभागी होवुन संघटीत होवून प्रश्न मार्गी लावण्यासाठी तज्ञ अभ्यासक म्हणून नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. मी स्वत: शेतकरी असून शेकापचा पदाधिकारी आहे. शेतकर्‍यांना समोर ठेवून मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. पाणी वाटपाचा प्रश्न बजेट मुळे प्रलंबीत रहातो. शेतकर्‍यासाठी स्वामिनाथन आयोग लागू झाला पाहिजे. त्यातील शिफारशी लागू झाल्या पाहिजेत. शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च निघाला पाहिजे. प्रामुख्याने शेती मालाच्या भावाचा प्रश्न उपस्थित झाला पाहिजे. यासाठी अभ्यास हवा अभ्यासाशिवाय गोष्टी पुढे सरकरणार नाहीत हे श्री पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. कार्यक्रमात श्री गायकवाड, श्री रेणके, डॉ. बशारत अहमद, अ‍ॅड. रेवण भोसले यांनी भाषणे केली. प्रास्ताविक संतोष हंबीरे यांनी केले 

 
Top