उस्मानाबाद / प्रतिनिधी-

बंडखोर आमदारांच्या गळातून अगलदपणे निसटलेले शिवसेनेचे उस्मानाबादचे आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांचे कौतुक करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना एक पत्र पाठवले असून, पक्षप्रमुखांचे हे पत्र मिळाल्यानंतर आमदार कैलास पाटील यांनी आज कृतज्ञ झालो, अशा शब्दांत पक्षप्रमुखांबद्दल प्रेम व्यक्त केले.

शिवसेनेतील बंडखोरीने पक्षासमोर प्रचंड संकट उभे आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडून बंडखोरांना कधी भावनिक साद घातली जात आहे तर कधी त्यांच्यावर टीकास्त्रही सोडले जात आहे. मात्र, यादरम्यान ज्या आमदारांनी पक्षप्रमुख ठाकरे यांना साथ दिली, बंडखोर आमदारांच्या प्रलोभनाला बळी पडले नाहीत, अशा आमदारांबद्दल ठाकरे यांनी रविवारी पत्र लिहिले आहे. शिवसेनेसोबत राहिलेल्या सर्वच १५ आमदारांना हे पत्र पाठवले. त्यात उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांचाही समावेश आहे. या पत्रात पक्षप्रमुखांनी आपला महाराष्ट्राला अभिमान वाटला, अशा शब्दांत कौतुक केले असून, हे पत्र प्राप्त झाल्यानंतर उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनीही या पत्राला प्रतिसाद आपली भावना व्यक्त केली आहे.

 आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी व्यक्त केलेली भावना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पत्र प्राप्त झाले आणि एक अर्थाने कृतार्थ झालो. राजकारणात तत्व, निष्ठा ही मूल्ये पाळायचे बाळकडू हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी लाखो शिवसैनिकांना पाजले आहे. सच्चा शिवसैनिक ही मूल्ये आजही प्रामाणिकपणे, तळमळीने पाळतो हे मागच्या काही दिवसांत संपूर्ण देशाने पाहिले आहे. राजकारणात सत्ता येते जाते, पदे मिळतात आणि जातातही. पण सच्चा शिवसैनिकांच्या तत्वात काडीचाही अंतर कधी येत नसतो. ८० टक्के समाजकारण व केवळ २० टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन संघर्षाला उतरलेल्या मावळ्यांना सत्ता-पदाची नक्कीच फिकीर नाही. शिवसेना आणि शिवसैनिक येणाऱ्या आव्हानांना निधड्या छातीने समोर जातात, हेही वेळोवेळी सिद्ध झाले आहे. संघर्षाची वीण घट्ट गुंफून, चला पुन्हा उठुया पेटून, चला पुन्हा लढूया पेटून.


 
Top