उस्मानाबाद / प्रतिनिधी-

श्रीपतराव भोसले हायस्कूलमधील सन 1986 सालच्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थिनींनी तब्बल 36 वर्षानंतर एकत्र येऊन स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. एकमेकींची ख्याली-खुशाली जाणून घेऊन शाळेत घडविणार्‍या गुरुजनांचा भेटवस्तू देऊन सन्मानही या मेळाव्यात करण्यात आला. विशेष म्हणजे तब्बल 36 वर्षानंतर एकमेकींना पुन्हा भेटल्याचा आनंद सार्‍याजणींच्या चेहर्‍यावर झळकत होता.

 1986 सालच्या बॅचमधील काहीजणींनी पुढाकार घेऊन शहरातील परिमल मंगल कार्यालयामध्ये शनिवारी (दि.23) या मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यासाठी आपसातील परिचय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकींचे संपर्क क्रमांक मिळवून तब्बल 30 जणी एकत्र आल्या. सकाळी चहा-नाश्त्यानंतर नव्याने ओळखी, एकमेकींची विचारपूस करुन गप्पागाणी करत या स्नेहमेळाव्याला सुरवात झाली.

 स्नेहमेळाव्यादरम्यान ज्या शिक्षकांनी घडविले त्या गुरुजनांचा शाळेतच म्हणजे श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये जाऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळचे अनेक शिक्षक दिवंगत झाले असून हयात असलेल्या शिक्षकांच्या घरी जाऊन या माजी विद्यार्थिनींनी  शाळेत आणले. यासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सुधीर पाटील, सेवानिवृत्त शिक्षक श्री.पठाण यांनीही सहकार्य केले. शिक्षकांनी कौतुकाने भर पावसात या कार्यक्रमाला आवर्जुन हजेरी लावली.

 माजी मुख्याध्यापक श्री. पडवळ, उपमुख्याध्यापक बी. जी. जाधव, एस. व्ही. देशमुख, डोके, श्री.शेळके, सौ.शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमास गुरुजनांच्या सन्मान सोहळ्याला सुरुवात झाली. एकूण 18 शिक्षकांचा भेटवस्तू, शाल, श्रीफळ, मिठाई आणि पर्यावरण पूरक नॅपकिनचा बुके देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थिनी संगीता पिंपरे, सुवर्णा पुरी, भारती कुलकर्णी, जेमिनी कामतीकर, राणी जाधव, अनुराधा जोशी यांनी आपल्या मनोगतात गुरुजन आणि शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त व्यक्त केली.

 सत्काराला उत्तर देताना गुरुजनांनी सर्व माजी विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच जीवनात चांगला माणूस व्हा, घरातील वडीलधारी मंडळीची काळजी घ्या, सुखी-समाधानाने रहा असे मार्गदर्शन केले.   याच कार्यक्रमात माजी विद्यार्थिनींनी गरीब, होतकरू विध्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्य देण्यासाठी रोख रक्कम देणगी दिली.

 या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थिनी मीना हिरासकर, वैशाली गांधी, संगीता देशपांडे, अश्विनी नाईकवाडी, राणी जाधव, मंजुषा भूमकर, वंदना रोंगे, धनवंती देशमुख, सुजाता राजे आदींनी पुढाकार घेतला.  

 
Top