उस्मानाबाद / प्रतिनिधी-

बेहिशोबी मालमत्ता (अपसंपदा) संपादित केल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने कळंब जि. उस्मानाबाद येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या तत्कालिन तहसीलदार वैशाली नेमगोंडा पाटील यांच्यावर कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात तक्रार आल्याने झालेल्या चौकशीत २२ लाख ४ हजार ३३७ रुपये (२९ टक्के) बेहिशोभी मालमत्ता जमा केल्याचे उघड झाले.

पोलीसांनी सांगितले की, कळंबच्या तत्कालिन तहसीलदार वैशाली पाटील यांनी नोकरी करीत असताना अवैध मार्गाचा अवलंब करून बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने श्रीमती पाटील यांनी मार्च २००८ ते ३० जून २०१६ या कालावधीत अवैध मार्गाने कमावलेल्या संपत्तीची चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांनी त्यांना सर्व ज्ञात व कायदेशीर मार्गाने मिळालेल्या उत्पन्नापेक्षा २२ लाख ४ हजार ३३७ रुपये (२९ टक्के) बेहिशोबी मालमत्ता संपादित करून गुन्हेगारी स्वरुपाचे गैरवर्तन केल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले. यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एसीबीचे पोलीस निरिक्षक अशोक हुलगे हे करीत आहेत.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी केली आहे.


 
Top