वारकरी साहित्य परिषदेचा तेर येथे उपक्रम


उस्मानाबाद /प्रतिनिधी- 

संत शिरोमणी श्री गोरोबा काका यांच्या तेर (ता. उस्मानाबाद) येथील मंदिरात व परिसरात वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्यच्या तालुका शाखेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबण्यात आली. यावेळी ज्ञानोबा - तुकारामाच्या गजरात तालुक्यातून आलेल्या शेकडो वाऱकऱ्यांनी हातात झाडू घेऊन मंदिर परिसर चकाचक केला.

वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने तेरच्या गोरोबा काका मंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भजन पार पडल्यानंतर परिषदेच्या तालुकाभरातून आलेल्या सदस्यांनी व वारकऱ्यांनी मोहीम राबवली. याचा शुभारंभ परिषदेचे तालुकाध्यक्ष हभप मोहन वाघुलकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष हभप श्रीहरी चौरे महाराज, लोहारा तालुकाध्यक्ष माऊली महाराज, उस्मानाबाद महिला तालुकाध्यक्षा शोभाताई लंगडे, सल्लागार अॅड. नाईकवाडी महाराज, तुळजापूर तालुकाध्यक्ष ढिगे पाटील महाराज यांची उपस्थिती होती.

उपक्रमात वारकऱ्यांनी हातात झाडू व टोपले घेऊन विठ्ठल नामाच्या गजरात मंदिर व मंदिर परिसर स्वच्छ केला. कचरा संकलित करून जाळून नष्ट करण्यात आला. यामुळे परिसर चकाचक दिसत होता. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी पोपळे महाराज कळंबकर, शंकर कोरे, परिक्षित नाईकवाडी, बिराजदार महाराज, पद्माकर शिंगाडे, शरद लांडगे, दादा महाराज सोनटक्के, हरिभाऊ सांगवे, शिंदे महाराज महादेववाडीकर आदी उपस्थित होते.

तिर्थस्थळांची स्वच्छता वारकऱ्यांची जबाबदारी

तिर्थस्थळावर अनेक वारकरी येत असतात. दर्शन व नामसंकीर्तनाचा आनंद घेऊन निघून जातात. मात्र, येथील स्वच्छतेची खरी जबाबदारी वारकऱ्यांचीच आहे. कार्यक्रम, उत्सव, जत्रा संपल्यावर वारकऱ्यांनी स्वच्छतेची सेवा अर्पण करण्याची गरज आहे. यामुळे मंदिराचे पावित्र्य टीकून राहिल. वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने जिल्ह्यात सर्वत्र असा उपक्रम राबवण्यात येणार आहे, असे तालुकाध्यक्ष वाघुलकर महाराज यांनी सांगितले


 
Top