उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रोजगार हमी योजनेतून सीताफळ लागवडीसाठी मिळणार्‍या अनुदानाकरिता एका मस्टरसाठी पाचशे रुपयाप्रमाणे लाचेची मागणी केल्याप्रकरणी उस्मानाबाद तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सारोळा सज्जाचा कृषी सहायक श्रीकांत रामकृष्ण मगर याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुन्हा दाखल केला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडून मिळालेल्यज्ञा माहितीनुसार, फिर्यादीच्या आईचे उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथे असलेल्या शेतात शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत सीताफळ लागवडीसाठी मिळणार्‍या अनुदानाकरीता अर्ज दाखल केल्यानंतर एका मस्टरसाठी पाचशे रुपये प्रमाणे जेवढे मस्टर होतील तेवढ्या मस्टरचे पैसे द्यावे लागतील असे म्हणून लाचमागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केल्यानंतर पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने आज आरोपी कृषी सहायक श्रीकांत मगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, इफ्तेकार शेख, विष्णू बेळे, नागेश शेरकर  यांच्या पथकाने ही कारवाई केली.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोणी सरकारी अधिकारी/ कर्मचारी कायदेशीर कामासाठी लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, उस्मानाबाद ( फोन नं.02472 222879, भ्रमणध्वनी क्र. 95279 43100, 86524 33397, 77190 58567) येथे संपर्क साधण्याबाबत आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी केले आहे. 

 
Top