उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

रशिया-युक्रेन युद्धाची धग जवळून अनुभवलेल्या डॉ.आकाश अरुण माने यांचा उस्मानाबाद येथे मायभूमीत आल्यानंतर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील व माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या हस्ते आज (दि.5) सत्कार करण्यात आला.

उस्मानाबाद तालुक्यातील अनसुर्डा गावचे माजी सरपंच अरुण दत्तात्रय माने यांचे सुपुत्र डॉ.आकाश माने हे रशियात मेडिकलच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहेत. तीन महिन्यांपूर्वी रशिया आणि युक्रेन देशात युद्धजन्य परिस्थितीमुळे अद्यापही तणाव कायम आहे. या युद्धाची सुरुवात झाल्यानंतर रशियातील प्रीवल्स स्टेट मेडिकल युनिवर्सिटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ.आकाश यांच्या सुखरुपतेसाठी पालक अरुण माने यांनी केलेल्या विनंतीनंतर उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधून डॉ.आकाश यांच्याबाबत माहिती कळवली होती. तेव्हा रशियातील भारतीय दूतावासातील राजदूतांनी डॉ.आकाश माने यांना मोठा आधार दिला होता. त्यामुळे माने कुटुंबीय निश्चिंत झाले. दरम्यान दोन महिन्यांच्या सुटीसाठी डॉ.आकाश हे गावी परत आलेले आहेत.

यानिमित्ताने उस्मानाबाद येथे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील व माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या हस्ते डॉ.आकाश माने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालक तथा अनसुर्ड्याचे माजी सरपंच अरुण माने, भाजपाचे जीवन देशमुख, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, हणमंत देवकते आदी उपस्थित होते.


 
Top