उस्मानाबाद / प्रतिनिधी-

संपूर्ण भारत देशात हे वर्ष “स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष” म्हणून साजरे केले जात आहे. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या डिपार्टमेंट ऑफ फायनांशियल सर्विसेस मार्फत 08जून 2022 ते 14 जून 2022 हा सप्ताह आयकॉनिक सप्ताह म्हणून साजरा करण्यासाठी निर्देशित करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 08 जून 2022 रोजी उस्मानाबाद येथे उमेदच्या सहकार्याने लीड बँकेमार्फत जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात क्रेडिट आऊटरीच कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रकल्प संचालक डी.आर.डी. ए. श्रीमती प्रांजल शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद उस्मानाबादचे  मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल गुप्ता ह्यांच्या शुभहस्ते महिला बचत गट तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना कर्जाचे मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले.

या कॅम्प मध्ये साधारण 395 लाभार्थ्यांना 6 कोटी 20 लक्ष इतक्या रकमेची कर्ज प्रकरणे मंजूर केल्याची पत्रे विविध बँकांमार्फत प्रदान करण्यात आली. या प्रसंगी सर्व लाभार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद श्री.राहुल गुप्ता, प्रकल्प संचालक डी.आर.डी.ए. श्रीमती प्रांजल शिंदे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री.शरद खोले, बँक ऑफ महाराष्ट्र चे मुख्य व्यवस्थापक श्री.वैद्यनाथ तसेच बँक ऑफ इंडिया चे मुख्य व्यवस्थापक श्री. मल्लेस्वरा यांनी मार्गदर्शन केले.

ज्या प्रकारच्या व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज मंजूर केले आहे त्यासाठीच जर लाभार्थ्यांनी मिळालेल्या रकमेचा विनियोग केला व वेळेत कर्जफेड केली तर निश्चितच बँकेकडे तुमची पत वाढेल व पुढील वेळी तुम्हाला जास्त रकमेचा वित्त पुरवठा बँका करतील असा विश्वास उपस्थित अधिकाऱ्यांमार्फत व्यक्त करण्यात आला. या वेळी प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे यांनी उस्मानाबाद मधील बचत गटांच्या प्रॉडक्ट ला सर्व दूर मागणी असल्याने पुणे येथेही आपल्या गटांच्या प्रॉडक्टच्या विक्रीसाठी कॅम्प आयोजित केल्याची माहिती उपस्थितांना दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अनिल मालखरे तर आभार प्रदर्शन उमेद चे श्री.समाधान जोगदंड यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लीड बँकेचे श्री. शरद खोले,श्री.राहुल जोशी व नितीन रसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.


 
Top