उस्मानाबाद / प्रतिनिधी-

देशात अशांततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काहीजण करत असताना उस्मानाबाद जिल्ह्यात रमजान ईदसह सर्वधर्मीयांचे सण, उत्सव शांततेत साजरे करण्यात आले. यापुढील काळातही हिंदु व मुस्लिम बांधवांनी सर्वधर्मीय समभाव ठेवून एकोप्याने सण उत्सव साजरे करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केले. यावेळी उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून सलोखा कायम ठेवल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे त्यांनी आभार मानले.

 मशिदींवरील भोंग्यांच्या प्रश्नावर शहरात निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष मैनुद्दिन पठाण यांच्या वतीने उस्मानाबाद शहरातील हजरत ख्वाजा शम्सोद्दीन गाजी यांच्या दर्ग्यात हिंदू व मुस्लिम बांधवांसाठी ईद मिलन कार्यक्रमाचे आज (दि.5) आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती समितीचे मार्गदर्शक प्रकाश जगताप, मराठा महासंघाचे भारत कोकाटे, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे विष्णू इंगळे, मनसेचे तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख, शहराध्यक्ष नवनाथ चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्याण घेटे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकांत जैस्वाल यांच्यासह हिंदू व मुस्लिम समाजातील विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच समाजबांधव उपस्थित होते.

 
Top