तुलजापूर/ प्रतिनिधी-
लातूर येथून प्रवासी घेऊन निघालेली एसटी महामंडळाची शिवशाही बस व ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात बस मधील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. तुळजापूर-नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या बायपास चौकात शनिवारी (दि.२८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडला.
लातूर आगाराची शिवशाही बस (क्र. एमएच-०६ बीडब्ल्यू ०८९८) लातूर येथून तुळजापूरकडे जाताना नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील बायपास चौकात येताच बायपास मार्गे भरधाव आलेल्या मालवाहतूक ट्रकने (क्र. आर. जे. १९, जीएफ ७६५७) बसला समोरुन धडक देत २० फूट घासत नेले. त्यामुळे बस व ट्रक रोडच्या बाजुला आदळले. या अपघातात बस मधील शोकतबी नासीर पटेल (६५), शोभा यशवंत कानडे (६०), हमानाराम मिशराम (३५), मौनोदीन सरदारसाहब शेख (२२), किरण रंगनाथ गंुंडले (३१), सोपान विठ्ठलराव भागवत (४३) हे सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.