उस्मानाबाद /प्रतिनिधी -

 पोलीस अधिक्षक कार्यालयातील कार्यालयीन अधिक्षक नरसिंग कासेवाड यांनी कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपिक मच्छिंद्र कृष्णा जाधव यांना आज कार्यालयातच मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली. स्थानिक गुन्हे शाखा येथे बदली झालेल्या पोलीस अंमलदार यांच्याबाबत निनावी तक्रारी अर्ज आला होता. त्या अनुशंघाने नरसिंग यांनी मच्छिंद्र जाधव यांना काल जबाब दयायला सांगितला होता. म्हणून वरिष्ठ लिपिक मच्छींद्र जाधव यांनी नरसिंग यांच्याकडे सदर अर्जाची प्रत व पत्र मागितले असता नरसिंग यांनी मच्छींद्र जाधव यांना मारहाण करायला सुरुवात केली. लाथा बुक्क्यानी मारहाण करत पत्र व्यवहार शाखेत नेले तेथे मारहाण केली. यावेळी दोन सहकार्यांनी मध्यस्थी करत मारहाण करु नका म्हणून सांगत होते. मात्र, नरसिंग ऐकत नव्हते तर मच्छिंद्र जाधव हे नरसिंग यांना मला मारहाण करु नका म्हणून विनवणी करत होते. या दरम्यान नरसिंग यांनी मच्छिंद्र यांना शिवीगाळ केली. 'तुला जिवंत सोडणार नाही मी आय जी साहेब औरंगाबाद यांना व काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन तुझी वाट लावतो. तुझ्या विरोधात मी आय जी साहेबांना कसे भडकावतो मला सर्व सांगायची गरज नाही', असे म्हणत नरसिंग कासेवाड यांनी लिपिक मच्छींद्र जाधव यांना शिवीगाळ करत मारहाण केली. मच्छिंद्र जाधव यांनी कार्यालयीन अधिक्षक नरसिंग कासेवाड यांच्याविरूद्ध आनंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी NCR दाखल झाला असून भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे आनंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

 
Top