उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजना व कृत्रिम सहाय्यभूत साधनांचे वाटप करावयाच्या ADIP योजनेचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोंचविण्याच्या उद्देशाने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या हेतूने आज दि. ०८/०५/२०२२ रोजी प्रतिष्ठान भवन उस्मानाबाद येथे योजनेच्या नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून वयोमानानुसार दिव्यांगत्व आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून वैद्यकीय प्रमाणपत्र आधारे त्यांच्या आवश्यकतेनुसार विविध उपकरणे दिली जातात. यामध्ये चष्मा, चालण्यासाठी काठी, कृत्रिम दात, कवळी, श्रवणयंत्र, व्हीलचेअर, ट्रायपॉड, एलबो क्रचेस आदी उपकरणांचा समावेश आहे. देशातील काही निवडक जिल्ह्यांचाच या योजनेमध्ये समावेश आहे. योजनेची सुरुवात सन बरेच वर्षे होऊन देखील राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाच्या अनास्थेमुळे या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात आजवर करण्यात आली नव्हती. मात्र मागील महिन्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. डॉ.भारतीताई पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर याबाबत चर्चा झाली व आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.

या अनुषंगाने आज प्रतिष्ठान भवन उस्मानाबाद येथे या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दूरसंवाद प्रणालीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. राणाजगजितसिंह पाटील म्हणाले कि, राष्ट्रीय वयोश्री योजना व कृत्रिम सहाय्यभूत साधनांचे वाटप करावयाच्या ADIP या दोन्ही योजनांच्या माध्यमातून वयोमानानुसार दिव्यागत्व आलेल्या जेष्ठ नागरिकांना व दिव्यागांना मोठी मदत केली जावू शकते. आदरणीय मोदिजींनी आवर्जून उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश यामध्ये केला आहे. मात्र राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे या योजनेची अंमलबजावणीच जिल्ह्यात झाली नाही. या योजनेचे तीन टप्पे असून पहिल्या टप्प्यात नोंदणी, दुसऱ्या टप्प्यात तपासणी व अनुषंगिक उपकरणांचे मोजमाप तर तिसऱ्या टप्प्यात उपकरणांचे वाटप करण्यात येते.

ग्राहक सेवा केंद्रांच्या (CSC) माध्यमातून लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार असून त्यांच्याशी चर्चा सुरु आहे. त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शिबिरे आयोजित करून वैद्यकीय तपासणी करून उपकरणांची मोजमापे घेण्यात येतील व तद्नंतर केंद्रीय मंत्री यांना जिल्ह्यात आमंत्रित करून उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पुढकार घेवून लाभार्थ्यांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी याप्रसंगी केले.जेष्ठ नागरीक बाबुराव शेंडगे, अजित मारुतीराव, सुरेश दगडु चाकवते, दिव्यांग मारुती लक्ष्मण वाघमारे यांच्या नोंदणीने अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

 यावेळी युवा नेते मल्हार पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, भाजपा दिव्यांग आघाडी महाराष्ट्र प्रदेश सह्प्रभारी श्री.मारुती मुंडे, जिल्हा संयोजक समाधान मते, माजी प.स. उपसभापती आशिष नायकल, ओम नाईकवाडी, हिम्मत भोसले, जिल्हा सह संयोजक विठल गायकवाड, मेसा जानराव यांच्यासह बहुसंख्येने जेष्ठ नागरिक व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

 
Top