उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांची होत असलेली प्रचंड गैरसोय लक्षात घेता आगामी गळीत हंगामात तेरणा कारखाना सुरू होणे अत्यावश्यक असून, भैरवनाथ व ट्वेंटीवन शुगर्स यांच्यातील न्यायालयीन दावे-प्रतिदावे कितीही वर्षे सुरू राहतील. त्यामुळे ना. अमित देशमुख व आ. तानाजी सावंत यांची बैठक बोलावून न्यायालयाबाहेर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तातडीने बैठक घेण्याबाबत आग्रही मागणी करण्याचा निर्णय तेरणा कारखाना सुरू करण्यासंदर्भात आ. राणाजगजतसिंह पाटील यांनी बोलाविलेल्या आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

 तेरणा बचाव संघर्ष समितीच्या ६ सदस्यांनी ४ जूनला आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत रखडलेला तेरणा चा विषय मार्गी लावण्यासाठी न्यायालयाबाहेर तोडगा काढणे आवश्यक असल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले. आ. तानाजी सावंत हे शिवसेनेचे नेते आहेत, तर ना. अमित देशमुख हे मा. उद्धवजी ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य आहेत. त्यामुळे या दोघांवरती उद्धवजींचा अधिकार आहे. त्यांचे शब्द हे दोघे टाळू शकणार नाहीत, अशी बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या दोघांची बैठक घेऊन तातडीने विषय मार्गी लावणे बाबत तेरणा कारखान्याच्या ३५ हजार सभासदांच्या वतीने आग्रही मागणी करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. तसेच सदरील बैठक लवकरात लवकर लावण्यासाठी जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, असे आवाहन देखील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

 या बैठकीला तेरणा संघर्ष समितीच्या सदस्यांसह कारखान्याचे शेतकरी सभासद, माजी पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top