उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्हा आट्यापाट्या महिला संघाने पुन्हा एकदा सुवर्णपदकाची कमाई केली. कोरोना काळ संपल्यानंतर बुलडाणा येथे ३५ वी पुरुष व ३१ वी महिला राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धा १८ ते २० मे दरम्यान घेण्यात आली.

या स्पर्धेत राज्यातील अनेक संघांनी सहभाग नोंदविला. यामध्ये उस्मानाबाद जिल्हा महिला संघाने ठाणे, अमरावती, सोलापूर, जळगाव या संघांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भंडारा संघासोबत लढत झाली. अटीतटीच्या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी भंडारा संघाचा २-१ ने पराभव करत सुवर्णपदकावर दुसऱ्यांदा नाव कोरले.भारतीय आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव डॉ. दीपक कवीश्वर, सोलापूर जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब कापसे, उपाध्यक्ष राजकुमार मुंबरे, वाशिम जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे सचिव डॉ. विवेक गुल्हाने, अकोला जिल्ह्याचे सचिव सोनखास या मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघाला चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या खेळाडूंना जिल्हा संघटनेचे सचिव शरद गव्हार, राजाभाऊ शिंदे, अमित भागुडे, अनिल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सोमवंशी, सल्लागार संजय घुले व सर्व पदाधिकारी, क्रीडाप्रेमींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

शितल मेघराज शिंदे (कर्णधार), शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू कुमारी गंगासागर, उत्तम शिंदे, शिल्पा सर्जेराव डोंगरे, प्रीती भागवत शिंदे, निकिता धर्मराज शिंदे, वैष्णवी आनंद शिंदे, अनुजा शिवाजी लोंढे, गायत्री गोविंद माळकर, अक्षता नवनाथ मगर, ऋतुजा बाळासाहेब काटे, ऋतुजा तुकाराम माळकर, साक्षी सुनील एडके या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.


 
Top