उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्यात प्रधानमंत्री किसान नोंदणीकृत एकूण एक कोटी 14 लाख 93 हजार लाभार्थ्यांपैकी केवळ 81 लाख 36 हजार लाभार्थी किसान क्रेडिट कार्ड धारक आहेत. राज्यात जवळपास 33 लाख 57 हजार पी. एम. किसान नोंदणीकृत लाभार्थी  हे अद्यापही किसान क्रेडिट कार्ड धारक नाहीत. यासाठी दि. 24 एप्रिल रोजी उस्मानाबाद जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पी. एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या विशेष ग्रामसभेत पी. एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज देण्यात येतील. या ग्राम सभेमध्ये बँक प्रतिनिधी उपस्थित राहून ग्रामस्थांना या विषयी माहिती देणार आहेत. तरी सर्व ग्रामस्थांनी या विशेष ग्रामसभेस उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र शासनाच्या “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” या मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शकानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत पिक कर्ज, तसेच पशुधन, मस्त्यव्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत. ही मोहीम भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षांतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून दि. 24 एप्रिल 2022 ते 1 मे 2022 या कालावधीत देशभर राबविण्यात येत आहे. या मोहिमेत प्राधान्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत पिक कर्ज तसेच पशुधन, मस्त्यव्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध करण्यात येतील. या उपक्रमांतर्गत सामाजिक सुरक्षा योजना (प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा आणि अटल पेन्शन योजना) यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती, तसेच नवीन लाभार्थी नोंदणी करण्यात येईल. त्या सोबतच पिक विमा पाठशाला अंतर्गत पिक विमा योजने संदर्भात शेतकऱ्यांना माहिती देण्यात येणार आहे.

जिल्हयातील पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या सर्व  शेतकऱ्यांनी  या अभियानाचा  लाभ घेऊन  किसान  क्रेडीट कार्ड उपलब्ध करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

 
Top