उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील जुनोनी येथे तोडणीसाठी आलेल्या उसाच्या फडास सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आग लागल्यामुळे ३ शेतकऱ्यांच्या ५ एकरवर उभा असलेला उसाचा फड जळून खाक झाला आहे. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, या शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या तारांचा संघर्ष होऊन ठिणगी पडल्याने पेट घेऊन ऊस जळाल्याने नुकसान झाल्याचा दावा एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व विद्युत वितरण कंपनीकडे केला आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील जुनोनी शिवारात लक्ष्मण गजरंग मुळे यांच्या पावणेदोन एकर क्षेत्रावर तर रामचंद्र पंढरी मुळे यांच्या साडेतीन एकर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली होती. हा ऊस पूर्णतः वाढून तो तोडणीसाठी आला होता. मात्र या शेतातून गेलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या तारा उसाच्या फडावर लोंबकळत होत्या. वाऱ्यामुळे तारांचे घर्षण होऊन ठिणगी उसावर पडून उसाला सकाळी आग लागल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. आग लागल्याचे समजताच उस्मानाबाद येथून अग्निशमन दलाचे वाहन बोलाविण्यात आले. मात्र त्यांचेही प्रयत्न निष्फळ ठरले. आगीचा विस्तार मोठ्या प्रमाणात फैलाव न झाल्याने पुढील नुकसान टळले.  या‌ आगीत शेतकऱ्यांचे अंदाजे ६ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करावा व योग्य ती आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.


 
Top