उमरगा / प्रतिनिधी   

नगर परिषदेने विविध विकास कामाच्या ई - निविदा शासन निर्णयानुसार प्रसिद्ध केलेल्या नाहीत. शासन परिपत्रकाच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करत जाचक अटी घातल्याने स्पर्धा वाढण्याऐवजी कमी झाल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याने या संदर्भात चौकशी करण्याची तक्रार निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे मंगळवारी (ता. २२) कॉंग्रेस व भाजपाच्या माजी नगरसेवकांनी केली आहे.

जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उमरगा नगर परिषदेने सहा जानेवारी २०२२  व त्यानंतर विविध कामाची ई - निविदा प्रसिद्ध केलेली आहे. कांही निविदा २० जानेवारी तर कांही निविदा २७ जानेवारीपर्यंत भरावयाचे होते. निविदा प्रसिद्ध करताना कालावधी पंधरा दिवसाचा दिलेला आहे. परंतु शासन निर्णय २९ सप्टेंबर २०१८  निविदा प्रसिद्धीचा किमान कालावधी २५ दिवसाचा आहे. कालावधी कमी दिल्यामुळे स्पर्धा वाढविण्यास वाव मिळाला नाही त्यामुळे पालिकेचे नुकसान  झालेले आहे. शासन निर्णयानुसार निविदा पूर्व बैठक कमीतकमी सात दिवस अगोदर बोलावली असती तर मुद्याबाबत शंका निरसन झाले असते.  कामाची निविदा प्रसिद्ध करतेवेळेस कामाचा कालावधी सहा महिने दिलेला आहे, मात्र शासन निर्णयानुसार तीनशे दिवसाचा कालावधी असतो. निविदा प्रसिद्ध करताना देय कामाच्या किंमतीनुसार (प्रचलित दराने) तीन सारख्या पद्धतीचे कामे, ज्याचे कामनिहाय किंमत बोलावण्यात आलेल्या निविदेच्या अंदाजीत रक्कमेच्या ४० टक्के कमी नसावी. दोन सारख्या पद्धतीचे कामे, ज्याची कामनिहाय किंमत बोलावण्यात आलेल्या निविदेच्या अंदाजीत रक्कमेच्या ५० टक्के पेक्षा कमी नसावी. एकसारख्या पद्धतीचे काम, ज्याची किंमत बोलावण्यात आलेल्या निविदेच्या ८० टक्के कमी नसावी. असे शासन निर्णयाचे परिपत्रक आहे. परंतु निविदामध्ये अनुक्रमे ८० टक्के, १०० टक्के, १५० टक्के अशी जाचक अटी घालून निविदा काढली आहे. त्यामुळे स्पर्धा वाढविण्याऐवजी कमी करण्यासाठी केलेला हा प्रकार आहे. निविदा प्रसिद्ध करताना बिड कॅपेसिटीचा फॉर्मुला टाकण्याऐवजी शासन परिपत्रक तारीख घातलेली आहे, जे परिपत्रकात फॉर्मुला नमुद नाही. जाचक अटी घालून निविदा प्रसिद्ध केल्याने स्पर्धा वाढविण्याऐवजी स्पर्धा कमी करुन पालिकेचे नुकसान झालेले आहे. शासन निर्णयास धरुन ई - निविदा प्रसिद्ध केलेली नसल्याने या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून शासन निर्णयानुसार निविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. 

निवेदनावर माजी नगरसेवक विक्रम मस्के, सुनंदा वरवटे, सविता वाघमारे, ललिता सरपे, अरुण इगवे, संगीता औरादे, वसीम शेख, गोविंद घोडके यांच्या सह्या आहेत.


 
Top