उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील सांगवी (बेंबळी) येथे पत्नीच्या चारित्र्यावर शंका घेऊन तिचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अतिरिक्त शासकीय अभियोक्ता जयंत व्ही. देशमुख यांनी सांगितले, की महादेव पांडुरंग सुरवसे त्याची पत्नी सावित्री उर्फ बबिता हिच्यासह सांगवी येथे राहत होता. तो जुगार, दारू व्यसने करायचा. बबिता यांच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेऊन मारहाण करायचा. २०१९ ला गुढीपाडवा सणाच्या दोन दिवस अगोदर बबिता यांना पळसप येथील बबिताचे भाऊ पांडुरंग अंबादास चौधरी यांच्याकडे घेऊन आला. त्यावेळी तो चौधरी यांना म्हणाला होता की, ‘सावित्रीला शेवटचे बघून घ्या’ व तो परत बबितास सांगवी येथे घेऊन गेला. ७ एप्रिल २०१९ ला महादेव याने घरात रात्री नऊला बबिता झोपल्या असताना डोक्यात मोठा दगड घालून खून केला. तसेच जीव गेला नाही म्हणून तिचा गळाही आवळला. याची कबुली महादेवने रवींद्र पांडुरंग पाटील यांना दिली. पाटील यांनी माहिती चौधरी यांच्या मुलाला दिली. त्यावर चौधरी यांनी पाहिले असता बबिताचा मृतदेह दाराजवळ पडलेला दिसला. तिच्या गळ्यावर गळा दाबल्याचे व्रण, डोके फुटलेले व ती रक्ताच्या थारोळ्यात दिसून आली.

प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक उत्तम जाधव यांनी केला. एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आलेले होते. त्या साक्षी व परिस्थितीजन्य पुरावा, श्वान पथकाचा पुरावा व आरोपीने एका साक्षीदाराला दिलेली गुन्ह्याची कबुली यावर गुन्हा सिद्ध केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.आर.नेरलेकर जन्मठेपेची शिक्षा पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली. यामध्ये अॅड. देशमुख यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. 

 
Top