उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद-तुळजापुर-सोलापुर मंजुर रेल्वेमार्गाचे भुसंपादनाची प्रक्रिया अधिक गतीने करण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी अशा सुचना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यानी दिल्या. रेल्वे प्रकल्पाच्या भुसंपादन प्रक्रियाबद्दलची सद्यस्थिती जाणुन घेण्यासाठी खासदार राजेनिंबाळकर यांनी महसुल तसेच सबंधित यंत्रणेची बैठक बोलावली होती. सद्यस्थितीला भुसंपादनासाठी एका गावाला लागणारा कालावधी पाहिला तर तो अधिक वेळखाऊ असल्याने मनुष्यबळ वाढविण्याच्या सुचना देखील खासदार ओमराजे निंबाळकर यानी दिल्या आहेत, त्यामुळे या प्रक्रियेला पुढील काळात गती येण्यास मदत होणार आहे. 

यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, रेल्वेचे उपमुख्य अभियंता राजेश नागराळे, सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री. राजनारायण, सेक्शन इंजिनियर नुर्स सलाम आदी. संजय मंत्री आदीची उपस्थिती होती.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मार्गाचा नव्याने सर्व्हे केला असुन त्यानुसार उस्मानाबाद तालुक्यातील नऊ व तुळजापुर तालुक्यातील पंधरा गावातील जमीन संपादन होत आहे. उस्मानाबाद तालुक्यातील गावाचे रेल्वे विभागाने सादर केलेले भुसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी (भुसंपादन अधिकारी) यांच्या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. यासाठी उपअधिक्षक भुमी अभिलेख यांच्याकडे मोजणीसाठी 62 लाख रुपये फीस देखील भरण्यात आली आहे. अजुनही संबधित गावातील 122 सर्व्हे नंबर (गटनंबर) यांची फिस भुमी अभिलेख कार्यालयाने कळविलेली नाही. सध्या एका गावाचे मोजणी करण्यासाठी लागणारा कालावधी दहा ते बारा दिवसाचा आहे, त्यासाठी खाजगी मनुष्यबळ घेऊन त्यांना देखील या कामामध्ये समाविष्ट करण्याच्या सुचना खासदार राजेनिंबाळकर यानी दिल्या आहेत. त्यावरी खर्च प्रशासकीय बाबीतुन करण्याची तरतुद असल्याचेही त्यानी यावेळी सांगितले. साहजिकच पुढील काळात मोजणीसाठी लागणारा कालावधी अजुन कमी होणार आहे.  

 तुळजापुर रेल्वे स्टेशनसाठी नियोजीत केलेल्या जमीनीची 14 जुलै 2019 रोजी खासदार ओमराजे निंबाळकर यानी स्थळपाहणी केली होती. तेव्हा त्यातील काही जमीन वन विभागाकडे हस्तांतरीत केल्याचे दिसुन आले होते. या भुसंपादनाचे कार्यवाही करताना विलंब लागण्याची शक्यता खासदार राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे त्याबाबत अधिक गतीने काम करण्याच्या सुचना त्यानी दिल्या होत्या. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यावर कसबा सोलापुर, सांगवी मार्डी (ता.तुळजापुर) व तुळजापुर ग्रामीण येथे वनजमीन संपादनासाठी येत आहे. वन जमीनीचे क्षेत्र पाच हेक्टरपेक्षा अधिक असेल तर त्याला विलंब लागु शकतो परंतु या मार्गात प्रत्येक गावात एक ते अडीच हेक्टर पर्यंत वनजमीनीचे क्षेत्र असल्याने त्यास परवानगी मिळण्यास अडचणी येणार नसल्याचेही खासदार राजेनिंबाळर यानी सांगितले आहे.

दर पंधरा दिवसाला आढावा -

या मार्गातील भुसंपादन प्रक्रियेचा आढावा दर पंधरा दिवसानी घेतला जाणार असल्याचे खासदार ओमराजे यानी सांगितले.आतापर्यंत ही दहावी बैठक असुन त्यामुळे पुढील काळात अधिक गतीने काम करण्यासाठी प्रशासन देखील प्रयत्न करेल अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली आहे.


 
Top