काटी / प्रतिनिधी-

 वीरशैव समाजाचे पंच पिठापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र काशी येथील जंगमवाडी मठाचे नूतन उत्तराधिकारी म्हणून उच्चशिक्षित व पीएचडीप्राप्त बृहनमठ होटगी मठाचे मठाधिपती धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी  यांची निवड करण्यात आली आहे. बुधवारी दि. 9 रोजी कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील बिसनहळी येथे उज्जैनी पिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, श्रीशैल पिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 जगद्गुरु चनसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काशी पिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी  आपले उत्तराधिकारी म्हणून होटगी मठाचे मठाधिपती धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांची त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन निवड जाहीर केली. 

       श्रीक्षेत्र काशी पिठाचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर शनिवार दि.12 रोजी तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील त्यांचे भक्त व दुलंगे परिवाराने त्यांना निमंत्रित केले होते. यावेळी मंगरुळ ग्रामस्थ व दुलंगे परिवाराच्या वतीने त्यांची हत्तीवरून दुपारी संपूर्ण गावातून मोठ्या थाटात ढोल ताशाच्या गजरात व भजन गायनाच्या स्वरांत मिरवणूक काढून अभुतपुर्व असे जंगी स्वागत करण्यात आले.           

      अतिशय थाटात व शिस्तबद्ध पद्धतीने मंद्रुप संस्थानचे मठाधिपती शिवाचार्य महास्वामीजी, नागणसुर संस्थानचे मठाधिपती शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारों नागरिकांच्या सहभागात निघालेल्या मिरवणुकीत रस्त्यावर काढलेल्या रांगोळीवरुन अनेक सुहासिनी महिला डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. हे अविस्मरणीय आणि विलोभनीय दृश्य पाहून श्रीक्षेत्र काशी पिठाचे नुतन उत्तराधिकारी धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी भारावून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.

      यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मंगरुळ ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रेमामुळे मी भारावून गेल्याचे सांगून विविध धर्माची उपासना जरी वेगळी असली तरी उपासनेची शक्ती अफाट आहे. सर्व धर्मात सत्याला किंमत असून  सत्य हाच जीवन धर्म असल्याचे सांगत कोणताही धर्म असला तरी धर्माविषयी श्रध्दा असायला हवी  मानवता धर्म  हाच  सर्व धर्मांचा पाया असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. कुठलीही व्यक्ती त्यांचे ध्येय यशस्वी करण्यासाठी सहजरीत्या तिथे पोहचलेली नसते. यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.अपयशाने खचून न  जाता व धिराने आपण डोळ्यासमोर ठेवलेले ध्येय गाठण्यासाठी आपला दृष्टिकोन आपल्याला ध्येय गाठण्यासाठी मदत करीत असतो असे सांगून जीवनात यशस्वी होण्यासाठी आईवडील व गुरुंचे विचार आत्मसात करून आचरणात आणावे असे मत व्यक्त केले. तसेच मंगरुळ वासियांनी दाखवलेल्या प्रेमामुळे मी भारावून   गेलो असून आपल्या या सन्मानाचा मी कायम ऋणी राहीन व या मान सन्मानाचा मी देश पातळीवर विशेष उल्लेख करून मंगरूळ गावाची शोभा वाढवेन असे गौरवोद्गारही त्यांनी  काढले.

   यावेळी मंगरूळ व परिसरातील सर्वच जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगरूळ ग्रामस्थ व दुलंगे परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.


 
Top