उस्मानाबाद / प्रतिनिधी-

प्लॉटधारकाने आपल्या कार्यालयात सातबारा ऑनलाइन करण्यासाठी अर्ज केल्यानंतर त्याच्या फेरफारच्या नोंदी तपासणे व मूळ मालकाच्या क्षेत्राशी क्षेत्र जुळवण्याची कार्यवाही तलाठी स्तरावरच पार पाडण्यात यावी, त्यासाठी प्लॉट धारकाला कार्यालयास वारंवार चकरा माराव्या लागू नये व सातबारा ऑनलाईन करण्यासाठी दाखल केलेली फाईल लवकर निकाली काढावी, अशी विनंती फोरम अॅफ उस्मानाबाद सिटिझन्सच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उस्मानाबाद शहरातील बहुतेक प्लॉट धारकाच्या प्लॉटची नोंदणी सातबारावरती ऑनलाईन पध्दतीने झालेली नाही. सातबारा ऑनलाइन करण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज दिला असता संबंधित प्लॉट धारकाला तो प्लॉट खरेदीपासूनचे संपूर्ण फेरफार दाखल करण्यासाठी सूचित केले जाते. संपूर्ण फेरफार उपलब्ध करून तलाठ्याकडे सादर केल्यानंतरही तुमच्या प्लॉटचे क्षेत्र मूळ जमीन मालकाच्या क्षेत्राशी जुळत नसल्याचे सांगून प्लॉट बसत नसल्याची बाब समोर करून सातबारा ऑनलाइन करण्याची प्रक्रिया थांबवली जाते. एखादी फाईल पूर्ण असेल व ज्याचे फेरफार व मूळ क्षेत्र जुळत असेल अशी फाईल नायब तहसीलदारांकडे मंजुरीसाठी पाठवल्यानंतर कधी दोन तर कधी तीन महिने त्यांच्याकडे प्रलंबित राहते. त्यामुळे प्लॉटचे सातबारा ऑनलाइन करण्यासाठी प्लॉटधारकांना तहसील कार्यालयास व तलाठी कार्यालयास वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. प्लॉटधारकाने तलाठी कार्यालयात सातबारा ऑनलाइन करण्यासाठी अर्ज केल्यानंतर त्याच्या फेरफारच्या नोंदी तपासणे व मूळ मालकाच्या क्षेत्राशी क्षेत्र जुळवण्याची कार्यवाही तलाठी स्तरावर व आपल्या कार्यालय स्तरावरच पार पाडण्यात यावी, यासंबंधीचे सर्वच रेकॉर्ड आपल्या कार्यालयातच असते. त्यासाठी प्लॉट धारकाला कार्यालयास वारंवार चकरा माराव्या लागू नये, तसेच सातबारा ऑनलाईन करण्यासाठी दाखल केलेली फाईल लवकर निकाली काढावी, अशी विनंती फोरम अॅफ उस्मानाबाद सिटिझन्सच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर अलीमोद्दीन शेख, रंगनाथ भोसले, बाळासाहेब सुभेदार, गणेश वाघमारे, नितिन शेरखाने आदींच्या स्वाक्षरी आहेत.

 

 
Top