उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या गुरूवारी (दि. 23) छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्षपदी धनंजय पाटील यांची निवड करण्यात आली.

बैठकीस परिषदेचे डॉ. सोमनाथ रोडे, माधव बावगे, अर्जुन जाधव, पन्नालाल सुराणा, नानासाहेब पाटील, सोमवंशी, संतोष हंबीरे यांच्यासह जिल्ह्यातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत डॉ. रोडे यांनी परिषदेचे मराठवाडा विकासासंदर्भात न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करीत असल्याचे सांगून मराठवाड्यातील जनतेमध्ये विकासाच्या नव्या जाणिवा निर्माण करणे, मराठवाड्याचे प्रश्न घेऊन संघटना विभागीय पातळीवर काम करत असताना मराठवाडा विकासाचा आराखडा तयार करीत असते. त्यास अनुसरून शासनाकडे पाठपुरावा करते. त्याचबरोबर शासनाने ठेवलेली उद्दीष्ट्ये व त्याच्या सुरू असलेल्या कामाला चालना देत असल्याचे त्यांनी सांगितले. परिषदेचे उद्दीष्ट्ये सांगताना मराठवाडा विभागाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी प्रयत्नशिल असणे त्याच बरोबर प्रत्येक क्षेत्रातील विकास होण्यासाठी संशोधनात्मक विकास करून परिषद दिशा देण्याचे काम करते, असे ते यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना डॉ. रोडे म्हणाले, शासकीय धोरण व योजनांचा अभ्यास करणे, जनतेमध्ये वैधानिक दृष्टीकोन ठेवणे व विकासाच्या जाणिवा निर्माण करणे हे परिषदेचे काम असल्याचे म्हटले. यावेळी बोलताना श्री. सुराणा यांनी उस्मानाबाद जिल्हा हा पाण्याच्या दृष्टीने व जलसंधारण कामामध्ये खूप मागे असल्याचे नमूद करून पाणलोट क्षेत्रात जलसंधारणाच्या कामात लक्ष ठेवण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच जिल्ह्यात कृषी क्षेत्रावर होणार्‍या संशोधन व आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याकडे पुढे आणण्याची गरजही सुराणा यांनी व्यक्त केली.

नानासाहेब पाटील म्हणाले, जिल्ह्यात जलसंधारणाची कामे होत आहेत. नदी, नाल्यांचे विस्तारीकरण, खोलीकरण करणे यामुळे पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. यासाठी नदी नाल्यांच्या पठाराचा अभ्यास करणे, पाणी आडवा, पाणी जिरवा उपक्रम राबविणे, भूगर्भाचा अभ्यास करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जुन जाधव यांनी केले. यावेळी बुबासाहेब जाधव, डॉ. बशारत अहमद यांनी मत व्यक्त केले. सूत्रसंचलन संतोष हंबीरे यांनी तर आभार विलास वकील यांनी मानले.


मराठवाडा जनता विकास परिषदेचा विस्तार व कार्य वाढवू मराठवाडा जनता विकास परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मराठवाडा जनता विकास परिषदेचा विस्तार करू व कार्य वाढवू यासाठी सक्षम कार्यकारिणी तयार करून परिषदेचे ध्येय धोरणे राबवित असताना उस्मानाबाद जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करून मागसलेपणा दूर करण्याचा प्रयत्न करू.

- धनंजय पाटील


 
Top