उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दि.10 नोव्हेंबर 2021 रोजी 362 वा शिवप्रताप दिन व शिवराज्याभिषेक सोहळा समितीचा स्थापना दिन या निमित्ताने शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याते डाॅ. शिवरत्न शेटे सर यांच्या ओघवत्या भाषेतून प्रतापगडचा रणसंग्राम या विषयावर व्याख्यान उत्स्फूर्त झाले.

प्रारंभी डाॅ. शिवरत्न शेटे सर, खासदार ओमप्रकाश निंबाळकर, आमदार  कैलास दादा पाटील, शिवसेना गटनेते नगरसेवक  सोमनाथ गुरव,शाम जाधव, प्रशांत  पाटील, समितीचे अध्यक्ष  शशिकांत खुने,उपाध्यक्ष  धर्मराज सुर्यवंशी,सचिव  दत्तात्रय साळुंके यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीस पुष्पहार घालून पूजा करण्यात आली.

त्यानंतर व्याख्याते व प्रमुख पाहुणे यांचा यथायोग्य सत्कार समारंभ पार पडला. कु.वसुंधरा संजय शिंदे हिने  शिवस्तवन सादर केले.व्याख्याते शेटे सरांनी यांनी अफजल खान वधाचा रोमहर्षक इतिहास अक्षरशः डोळ्यासमोर उभा केला.शेटे सर म्हणाले की, शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तिने काम करून अफजल खानाच्या प्रचंड पराभव केला. बुद्धी चातुर्याने लढलेले हे युद्ध म्हणजे मराठशाहीची मुहूर्तमेढ रोवणारी घटना होती.जगातील सर्वोत्कृष्ट युद्धामध्ये प्रतापगडचे युद्ध सर्वात वरच्या क्रमांकाचे युद्ध झाले. अस्सल कागदपत्रे, बखरी,परदेशी, समकालीन लेखक यांचे संदर्भ देऊन हा रणसंग्राम इतिहासाला कलाटणी देणारा ठरला अशी माहिती दिली.अचुक नियोजन, निष्णांत गुप्तहेर खाते,खंदे लढवय्ये,वेळेचा भौगोलिक परिस्थितीचा व शत्रूचा अभ्यास करून शिवाजी महाराजांनी अफजल खानासारख्या बलदंड, बुद्धीमान,क्रूर,कपटी,पाताळयंत्री,पराक्रमी, युद्धनिपुण अशा नावाजलेल्या योद्ध्यास व अदिलशाही फौजेचा प्रचंड मोठा पराभव करून अफजल खानास ठार मारले.श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात व्याख्यानाचा आस्वाद घेतला.यावेळी समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य तसेच समितीचे सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्तावीक अध्यक्ष शशिकांत खुने यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटक डाॅ.शतानंद दैठणकर यांनी केले.सुत्रसंचालन विश्वदिप खोसे यांनी केले.

 
Top