उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शुक्रवार दि.05 नोव्हेंबर 2021 रोजी पंतप्रधान  नरेंद्रजी मोदी  यांच्या शुभहस्ते श्री केदारनाथ धाम येथे विविध विकास कामांचे लोकार्पण, नविन कामांचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण कार्यक्रम संपन्न होणार आहे. केदारनाथ येथे श्रीमद आद्य शंकराचार्य यांच्या समाधी व मूर्तीचे अनावरण तसेच या क्षेत्रात झालेल्या जवळपास रुपये 200 कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण तसेच रुपये 200 कोटींहुन अधिकच्या विकास कामांचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण सोहळा संपन्न होणार आहे. आद्यगुरु शंकराचार्य यांनी देशभरातील ज्या तिर्थक्षेत्रांना पदस्पर्श केला, मठांची स्थापना केली तसेच १२ ज्योर्तीलिंग अशा देशभरातील एकुण ८२ तिर्थक्षेत्री हा कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरा होणार आहे. या सर्वच ठिकाणी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील माहुर, पंढरपुर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, तुळजापुर, भिमाशंकर, घृणेश्वर, वेरुळ व कोल्हापुर अशा ९ ठिकाणी मोठया स्तरावर कार्यक्रम होणार आहेत. तुळजापुर येथे श्री तुळजाभवानी देवीच्या महाद्वारा समोर मोठ्या स्क्रीनवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार असून यावेळी विविध मठांचे महंत शिवाचार्य, साधु संत, प्रतिष्ठित उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या वास्तव्याने पावन तिर्थक्षेत्र देखील याच धर्तीवर केंद्र शासनाच्या प्रशाद योजने अंतर्गत विकसीत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तुळजापुर तिर्थक्षेत्र एक वैश्वीक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणुन विकसीत करण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्याला लाभलेल्या ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा यामुळे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचा व पर्यटन स्थळांचा विकास करून येथील अर्थकारणाला मोठी चालना मिळू शकते. ही बाब लक्षात घेऊन गृहमंत्री ना.अमित शहा साहेब यांनी तुळजापुर तिर्थक्षेत्र वैश्वीक पर्यटन क्षेत्र म्हणुन विकसीत करण्याचा मानस व्यक्त केला होता. केंद्र सरकारचे यासाठी सर्वतोपरी सहकार्य असून स्वदेश दर्शन व प्रशाद योजनेच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात मोठया प्रमाणात गुंतवणुक वाढवुन या भागाचा विकास करण्याचा संकल्प आहे.

यासाठी भारतीय जनता पार्टी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी यावेळी केले. तरी नागरिकांनी या कार्यक्रमास सकाळी साडेआठ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे ,नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केले आहे.

 
Top