उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद : कधीकाळी जिल्ह्यातील राजकारणाचं प्रमुख केंद्र असलेला आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना  आगामी 25 वर्षासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय अखेर झाला आहे. शिवसेना नेते आमदार डॉ. तानाजी सावंत   यांच्या भैरवनाथ शुगरला   हा कारखाना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर घेण्यात आला. मार्च 2022 पर्यंत कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र, आगामी गळीत हंगामापासून तेरणेचे गाळप पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

असा आहे संपूर्ण व्यवहार आणि भाडे आकारणी?

तेरणा शेतकरी सहकारी कारखाना अवसायनात निघाला असून पाच हजार मेट्रीक टन इतकी गाळप क्षमता व देशी दारुचे उत्पादन, तसेच वीज निर्मीतीचा 14 मेगावॅटचा प्रकल्पचा समावेश आहे. भाडेतत्वावर देताना हा कारखाना 25 वर्ष करारावर देण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या चार वर्षी दोन कोटी रुपये, तर पाच ते करारसंपेपर्यंत सहा कोटी रुपये वार्षिक भाडे स्विकारले जाणार आहे. शिवाय भाड्यापोटी प्रतिमेट्रीक टन गाळपावर पहिले तीन वर्ष प्रति लिटर 73 रुपये, चौथ्या वर्षापासुन करार संपेपर्यंत 81 रुपयाप्रमाणे दिले जाणार आहे. डिस्टलरी पहिले दोन वर्ष प्रतिलिटर एक रुपये, दोन वर्ष दोन रुपये व पाचव्या वर्षीपासून चार रुपये करार संपेपर्यंत असणार आहे. देशी दारुवर पहिले दोन वर्ष प्रतिलिटर एक रुपये, दोन वर्ष दोन रुपये पाचव्या वर्षापासुन तीन रुपये आकारले जाणार आहे. वीजनिर्मीती प्रकल्पाच्या उत्पादनावर पहिले चार वर्ष दोन टक्के तर पाचव्या वर्षापासुन करार संपेपर्यंत तीन टक्के रक्कम आकारण्यात येणार आहेत. या भाडेकरारात कारखान्याची 105 हेक्टर 41 आर इतकी जमीन देखील मिळणार आहे. मालमत्ता जशी आहे आणि जिथे आहे, ज्या स्थितीत आहे, त्या स्थितीत अशा अटीवर व ज्यास कोणतीही हमी, खात्री, बंधन, जबाबदारी वा प्रतिनिधीत्वाशिवाय असलेल्या तत्वावर भाड्याने देण्यात येणार आहे.


 
Top