उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रंगमंचावर सादर होणार्‍या प्रयोगांच्या संहितांचे पूर्व परिक्षण करण्यासाठी राज्य सरकारने रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या सदस्यपदी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष तथा नियामक मंडळाचे सदस्य विशाल गंगाधर शिंगाडे यांची वर्णी लागली आहे.

रंगमंचावर सादर होणार्‍या प्रयोगांच्या संहितांचे पूर्व परिक्षण करून सार्वजनिक करमणूकीच्या जागी प्रयोग सादर करण्यासाठी या मंडळाला योग्यता प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे. या मंडळात राज्यातील साहित्य, कला क्षेत्रातील अनुभवी व तज्ञ मान्यवरांची राज्य सरकारकडून नियुक्ती करून परिनिरीक्षण मंडळ स्थापित करण्यात आले आहे. साहित्य व कला क्षेत्रातील एकूण १५ व्यक्तींची या मंडळावर नियुक्ती केली आहे. यामध्ये उस्मानाबाद येथील सामाजिक, सांस्कृतिक व कला क्षेत्रात मागील १८ वर्षांपासून सक्रिय असलेले विशाल शिंगाडे यांची वर्णी लागल्याने जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

उस्मानाबाद येथे २०१७ मध्ये पार पडलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नाट्य संमेलनासाठी शिंगाडे यांनी परिश्रम घेतले होते. तसेच परिषदेच्यावतीने त्यांनी विविध एकांकीका स्पर्धा, राष्ट्रीय पातळीवरही त्यांनी नाट्य परिषदेमार्फत मोठी कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेवून राज्य सरकारने रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर सदस्य म्हणून शिंगाडे यांची निवड केली आहे.

 
Top