उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

अतीवृष्टी व पुरामुळे २ लाख ८८ हजार १३७ शेतकऱ्यांच्या २ लाख ६६ हेक्टर क्षेत्रावरील पीके बांधित झाली आहेत. त्याबरोबरच मनुष्य हानी घरांची पडझड व जनावरे देखील या पाण्यात वाहून दगावली आहेत. विशेष म्हणजे रस्ते व पुल देखील खराब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभाग व विमा कंपनी यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. हे पंचनामे पुर्ण झाल्यानंतर येत्या महिन्या अखेर नुकसानीची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत शनिवार दि. २ ऑक्टोबर रोजी दिले. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सुध्दा विमा कंपन्याच्या पंचनाम्यानंतर मदत मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. परंतू अद्याप विमा कंपन्यांची मदतच मिळालेली नाही. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ.कैलास पाटील, माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा संघठक राजेंद्र शेरखाने आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, राज्यात अतिवृष्टी, पुर हे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व कोकण या भागात वारंवार होत असल्याचे आपण अनुभवत आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे व शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हयात २०० किलोमीटर आंतराचे १५० रस्ते व १०० ते १२५ पुल खराब झालेले आहेत. तर तलाव फुटण्याच्या पाच घटना घडल्या असून १ हजार ८७ घरांची पडझड झाली आहे तसेच स्थलातंरीत करण्यात आलेल्या १०० व्यक्तींना अन्न, वस्त्र व निवारा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या भागातील नुकसानीची पाहाणी करताना मी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला आहे. हातातोंडाशी आलेले पीक अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने शतप्रतिशत नुकसान झाल्याचे त्यंानी सांगितले.

विमा कंपनीस परवाना देणाऱ्या मंत्र्यांना भेटणार

यावेळी पत्रकारांनी गेल्या गेल्यावर्षीचा पिक विमा कंपन्यांनी दिलेला नाही, या वेळेस तरी ते देतील का ? असा प्रश्न उपस्थित केला असता मंत्री अमित देशमुख यांनी या संदर्भात आपण केंद्र सरकारकडे शिष्टमंडळ नेहून विमा कंपनीस परवाना देणाऱ्या संबंधित मंत्र्यांकडे तक्रार दाखल करून न्याय मागू, असे सांगितले. 

  वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार 

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना येत्या शैक्षणीक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल का ? या संदर्भात विचारले असता. मंत्री देशमुख यांनी २०२२-२३ या शैक्षणीक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याच्या दृष्टीकोनातुन तयारी चालू आहे, असे सांगून आमदार कैलास पाटील यांना बरोबर आहे ना....अशी साक्ष घेत स्पष्टीकरण दिले. 

 
Top