उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळविलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी ती तातडीने कळविण्याचे आवाहन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले आहे.

यंदाही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, गेल्या वर्षीचा अनुभव पाहता राज्य सरकार सरसकट मदत जाहीर करत आहे. मात्र, पिक विमा कारणे देऊन मदत देण्याचे टाळत असते. त्यामुळे गेल्यावर्षी अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले. त्याचा विचार करून यंदा विम्याबाबत माहिती कळवण्याची प्रक्रिया पुर्ण करणे आवश्यक आहे. यंदा सहा लाख ६७ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरून आपले पीक संरक्षित केले आहे. मात्र, नुकसानीची माहिती कळविण्याऱ्यांची संख्या अवघी दोन लाख २७ हजार एवढीच आहे. सरसकट मागणीची दखल सरकार घेईल, असा विश्वास व्यक्त करून खासदार राजेनिंबाळकर यांनी भरीव मदत पिकविम्याच्या माध्यमातून मिळण्यासाठी आपण कुठेही कमी पडता कामा नये. यासाठी झालेल्या नुकसानीची माहिती तात्काळ भरून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पिकविमा कंपन्या मुजोर आहेत, गेल्यावर्षी त्यांचा अनुभव राज्य सरकारला व शेतकऱ्यांना आला आहे. आपल्याला अधिकाधिक मदत मिळण्यासाठी जे काही करता येईल ते आपल्याला करावे लागणार आहे. पीकविमा कंपनीने ७२ तासात नुकसानीची माहिती कळवण्याचे केलेल्या आवाहनानुसार माहिती कंपन्यांना ऑनलाइन अथवा ऑफलाइन कळवण्याची आवश्यकता आहे.


 
Top