उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) सह परिसरातील शेतकऱ्यांचे पीक कर्जाची प्रस्ताव प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीच्या तोंडावर पैशाची नितांत गरज असून तातडीने पीककर्जाचे प्रस्ताव मंजूर करून कर्ज वाटप करण्यात यावे, अशी मागणी सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे मुख्य प्रबंधक शशी रंजन नारायण यांच्याकडे केली आहे.

उस्मानाबाद येथे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत मुख्य प्रबंधक शशी रंजन नारायण यांची श्री. बाकले यांनी मंगळवारी (दि.21) प्रत्यक्ष भेट घेतली. सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम तोंडावर आलेला आहे. शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज आहे. पिक कर्ज मिळावे यासाठी सारोळा सह परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव आपल्या बँकेत दाखल केलेले आहेत. गत अनेक महिन्यांपासून प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. अनेक शेतकरी बँकेत हेलपाटे मारून थकले आहेत. त्यामुळे आपण याकडे स्वतः लक्ष देऊन सारोळासह परिसरातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज मागणीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत अशी मागणी सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी मुख्य प्रबंधक शशी रंजन नारायण यांच्याकडे केली. यावेळी श्री नारायण यांनी पीक कर्जाचे तातडीने वाटप केले जाईल. मात्र सारोळा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कर्जाचे नूतनीकरण केलेले नाही. ते करणे अत्यंत गरजेचे आहे, असे सांगितले. त्यानंतर श्री बाकले यांनी आपण स्वतः व आपल्या बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी बुधवारी सकाळी सारोळा गावात यावे, आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढू, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी होकार देऊन सर्व बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन आम्ही गावात येऊ, असे सांगितले.

 
Top