उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यात विविध ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी ही सर्व मंडळात संततधार  पाऊस सुरूच होता. पावसामुळे  सोयाबीन पाण्याखाली गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तर या पावसामुळे हजारो एकर ऊस क्षेत्राचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  उडीद व मूग तर पहिल्या पावसातच जमिनदोस्त झाला आहे. याबाबत अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे.  7 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात 594.10 मिमी पाऊस झाला असुन हा पाऊस वार्षीक सरासरीच्या 98.91 टक्के झाला आहे.

परंडा, भूम, वाशी तालुक्याला शनिवारी रात्री व रविवारी व  सोमवारी दिवसभर पावसाने झोडपले हाेते. यानंतर मंगळवारी दिवसभर अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरूच होती.  यामध्ये उमरगासह तालुक्यातील नारंगवाडी, मुळज तसेच वाशी तालुक्यातील पारगाव मंडळात अतिवृष्टी झाली. अन्य ठिकाणी अतिवृष्टी इतका पाऊस झाला नसता तरी अन्य दिवसांपेक्षा याची अधिक तीव्रता होती. काही ठिकाणचे अपवाद वगळता सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन पाण्यात राहिल्यामुळे पिकांचा चिखल झाला आहे. काही ठिकाणी मृग नक्षत्रात पेरणी झालेले साेयाबीन काढणीसाठी आले होते. तेही सोयाबीन सध्याच्या पावसामुळे वाया गेले आहे. सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे साेयाबीनसह अन्य पिकांनाही फटका बसला आहे. यामुळे सोयाबीनच्या माध्यमातून अधिकचे उत्पन्न घेण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे.


 
Top